ते पैसे फाईलमधून कोणाला दिले?; विधिमंडळातील व्हायरल व्हिडिओवर भाजपच्या महिला आमदारांचं स्पष्टीकरण
आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्याजवळील फोल्डरमध्ये काही नोटा ठेवल्याचं दिसून येत आहे. मात्र, हा व्हिडिओ चुकीच्या आणि खोडसाळपद्धतीने व्हायरल केला जात आहे
मुंबई : विधानपरिषद निवडणुकांसाठी आज विधिमंडळ सभागृहात मतदान (Voting) होत असून राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी आणि कोणाची मतं फुटणार, यावरुन चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे एकीकडे मतदानाचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचा सभागृहातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल (Viral video) झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा सभागृहात आमदार आपलं म्हणणं मांडत असताना, संबंधित आमदाराच्या पाठिमागे बाकावर बसलेल्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna bordikar) आपल्या पर्समधून काही पैसे काढून फाईलमध्ये ठेवत असल्याचं दिसून येत आहे. आता, या व्हायरल व्हिडिओसंदर्भात आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्याजवळील फोल्डरमध्ये काही नोटा ठेवल्याचं दिसून येत आहे. मात्र, हा व्हिडिओ चुकीच्या आणि खोडसाळपद्धतीने व्हायरल केला जात आहे. विनाकारण विधानपरिषदेतील मतदानाशी या व्हिडिओचा संदर्भ जोडला जात असल्याने व्हायरल व्हिडिओवर आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र, नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे, असे स्पष्टीकरण आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिले आहे. त्यामुळे, संबंधित व्हिडिओ खोट्या पद्धतीने व्हायरल करणाऱ्यांनाही मेघना बोर्डीकर यांनी चांगलंच सुनावलं आहे.
सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले.
— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) July 12, 2024
मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज…
कोण आहेत मेघना बोर्डीकर
मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. परभणी जिल्ह्यात रामप्रसाद बोर्डीकर यांचं मोठं प्रस्थ आहे. 25 वर्षे काँग्रेसची आमदारकी भूषवल्यानंतर त्यांनी 5 वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. 1985 पासून जिंतूर पालिका, पंचायत समिती, बाजार समितीपासून थेट मुंबई बाजार समितीचे सभापतीपद त्यांनी भूषवले आहे. आता, त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून मेघना बोर्डीकर याही भाजपात तितक्याच सक्रिय नेत्या बनल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावातील साकोरे कुटुंबातील त्या सूनबाई आहे. आमदार बोर्डीकर यांचे पती दीपक साकोरे यांच्यासह त्यांच्या परिवारातील अनेक जण मंत्रालय स्तरावर उच्चाधिकारी आहेत. मेघना बोर्डीकर यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. जिंतूर मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विजय माणिकराव भमाले यांचा 3717 मतांनी पराभव केला. जिंतूर आणि परभणी भाजपमध्ये राजकारणातील सक्रिय नेत्या म्हणून कार्यरत आहेत.