(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Loksabha Election 2024: भाजप मुंबईतील लोकसभेच्या 5 जागा लढवणार, अमित शाहांनी आशिष शेलारांकडून रिपोर्ट मागवला?
Mumbai Loksabha Election: महायुतीच्या जागावाटपामध्ये मुंबईतील कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला. पुनम महाजन आणि गोपाळ शेट्टी यांच्याजागी दुसरा उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी. अमित शाहांनी आशिष शेलारांकडून रिपोर्ट मागवला?
मुंबई: भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपाच्या चर्चेत अचानक आक्रमक भूमिका घेतली असून ऐनवेळी 32 जागांवर लढण्याचा इरादा जाहीर केला आहे. हा प्रस्ताव एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या फारसा पचनी पडणारा नसला तरी अमित शाह (Amit Shah) यांनी जिंकून येणे हा एकमेव निकष डोळ्यांसमोर ठेवला आहे. अमित शाह यांनी दोन्ही नेत्यांना बैठकीत ही बाब स्पष्टपणे बोलूनही दाखवली. तसेच मुंबईतील लोकसभेच्या (Loksabha Election 2024) बहुतांश जागा लढवण्यासाठी अमित शाह आग्रही असल्याचे दिसत आहे. अमित शाह यांचे मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर विशेष लक्ष असल्याचे सांगितले जाते.
अमित शाह हे नुकतेच दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. ते मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी अमित शाह यांच्याकडून मुंबईतील 5 जागांवर भाजपचे उमेदवार उभे करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याचे समजते. त्यामुळे आता जागावाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांनी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून लोकसभा मतदारसंघांची माहिती मागवून घेतली आहे. पुनम महाजन आणि गोपाळ शेट्टी यांच्याजागी दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल, याची चाचपणी करण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले आहेत. त्यामुळे आता अंतिम जागावाटपात मुंबईत भाजपला किती जागा मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजपच्या मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी
भाजपच्या महाराष्ट्रातील 32 संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी नुकतीच समोर आली होती. यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या जागांचाही समावेश आहे. संभाव्या यादीनुसार, भाजपकडून उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना उत्तर मध्य मुंबईतून पुनम महाजन यांच्याऐवजी लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांनाच पुन्हा संधी द्यायचे ठरवले आहे.
आणखी वाचा
भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची संभाव्य यादी, मुंबईत धक्कातंत्र, बड्या खासदारांचा पत्ता कट