रुपाली चाकणकरांबद्दलचा प्रश्न विचारला, रक्षा खडसेंनी हात जोडले; जळगावातील वरिष्ठ नेत्यांनाही दिला सल्ला
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामधील राजकीय वैमनस्य शिगेला पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगाव : जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमधील वाद टोकाला पोहोचला असून आमदार एकनाथ खडसे यांनी हनीट्रॅप प्रकरणावतील आरोपी प्रफुल लोढावरुन मंत्री गिरीश महाजानांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर, काही दिवसांतच पुण्यातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर रंगेहात पडकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राज्य महिला आयोगानेही याप्रकरणात उडी घेत प्रांजल खेवलकरांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आल्याचे सांगत, मुलींची फसवणूक, अश्लील कारनामे आणि मानवी तस्करीचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यावरुन, आता राजकारण तापलं असताना केंद्रीयमंत्री रक्षा खडसेंना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, रुपाली चाकणकरांचा प्रश्न विचारताच रक्षा खडसेंनी (Raksha khadse) हात जोडल्याचं दिसून आलं.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामधील राजकीय वैमनस्य शिगेला पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या संदर्भात केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांना विचारले असता, प्रथम त्यांनी हात जोडले, हा आपला विषय नसल्याचं सांगत बोलणे टाळले होते. मात्र, कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, या नेत्यांमधील वादांमुळे आपल्याला ही दुःख होत आहे. मात्र, जबाबदार मंत्री असल्याने या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही, जिल्ह्यातील नेत्यांनी वाद करण्यापेक्षा विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्लाही मंत्री रक्षा खडसे यांनी दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणाचे आपल्याला दुःख आहे, आणि हे कुठे तरी थांबणे आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी वरिष्ठ नेत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले. नाव न घेता त्यांनी आपले सासरे एकनाथ खडसे आणि भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनाच हा सल्ला दिलाय.
खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर यांच्या या आरोपांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी त्या चेकाळल्या असल्याचं वक्तव्य केलं होतं. खडसे यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यात धरणगाव आणि रावेर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे, जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद आता टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा
आता, रोहित पवारांचं तोंड शिवलंय का? मारहाणीवरुन सदाभाऊंचा सवाल; आमदारांचेही जशात तसं उत्तर
























