मोठी बातमी! भाजपला गडकरींची अडचण, नागपुरातील अधिकाऱ्यांच्या मदतीने अडकवण्याचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
Prakash Ambedkar : नागपुरातील काही अधिकाऱ्यांना हाताशा धरून गडकरींनी लाच मागितल्याचे वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Prakash Ambedkar On Nitin Gadkari : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाजपाच्या (BJP) पक्षांतर्गत सत्तासंघर्षावर एक मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपमधील काही लोकांना नितीन गडकरींची (Nitin Gadkari) अडचण होत आहे. त्यामूळे ते गडकरींना बाजूला करण्याचा घाट घालतायेत. मात्र, गडकरी बाजूला व्हायला तयार नसल्याने, त्यांना अडकवण्याचा कट भाजपाचे काही लोकं रचत असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. यासाठी नागपुरातील काही अधिकाऱ्यांना पकडत त्यांच्याकडून गडकरींनी लाच मागितल्याचे वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. ते काल रात्री अकोल्यात मुस्लिम समाजाच्या एका बैठकीत बोलत होते.
याच बैठकीत त्यांनी मुस्लिम समाजालाही उपदेशाचे खडे बोल सुनावलेत. मुस्लिम समाजाने कानात सांगणाऱ्यांचं ऐकायचं बंद करावं. यासोबतच या निवडणुकीत तुम्ही मुस्लिम म्हणून मतदान केलं तरच टीकू शकाल असा इशारा दिलाय. असं केलं नाहीय तर पुढच्या काळात तुमच्या नशिबात पुन्हा गोध्रा, अखलाख आणि पॅलेस्टाईनसारखी परिस्थिती येईल असा इशारा आंबेडकरांनी दिलाय.
आपणच सिकंदर ठरणार
महाविकास आघाडीच्या आपसातील जागा वाटपाच्या शक्यतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दरम्यान, आपण हारलो किंवा जिंकलो तरी आपणच सिकंदर ठरणार असल्याचं सांगत आंबेडकरांनी त्यांच्या भूमिकेविषयी आणखी संदिग्धता वाढवलीय.
वायकरांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला.
काही दिवसातच निवडणुकीचे दिवस सुरू होतायेत. ही साधी निवडणुक नाही. संविधान बदलाचं आणि मुस्लिमांना लक्ष्य करण्याची सुरूवात आता होईल. गोळवलकरांच्या एका पुस्तकावर हे सरकार चालतंय. रवींद्र वायकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला. मात्र, जेव्हा पलीकडून फास आवळला गेला तेव्हा त्यांना पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर राहिला नाही. त्यामुळे ते शिंदे गटात गेले. मला वाटतं महाविकास आघाडी होण्यात मोठ्या अडचणी आहेत. पंधरा जागांवर तीनही पक्षांची भांडणं आहेत. 14 तारखेपर्यंत त्यांची भांडण सुटली तरच आमच्याशी वाटाघाटी होऊ शकेल. तसेच आम्ही दिल्या तेवढ्या जागा लढू, असेही आंबेडकर म्हणाले.
मुस्लिम आपली ताकद ओळखत नाही हेच त्यांचे दुर्दैव....
मॉब लिंचिंगपासून आपल्याला वाचायचं असेल, तर त्याच गर्दीशी मैत्री करा. त्या गर्दीचा एक भाग व्हा, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करा, त्यामुळे मॉब लिंचिंगची वेळ येणार नाही. देशात दलित आणि आदिवासींची जेवढी ताकद आहे, तेवढीच मुस्लिमांची आहे. मात्र, मुस्लिम आपली ताकद ओळखत नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. तुम्ही जागे झाले नाही, तर पुन्हा एक नवीन गोधरा, अखलाक किंवा फिलिपिन्स होईल हे लक्षात ठेवा, असे आंबेडकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :