Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
BJP on Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी ऐन नवरात्रीत कोल्हापूरला येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, यावरुन काँग्रेस किती हिंदुद्वेषी आहे हे कळाले, अशी टीका भाजपने केली आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) काल कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आले होते. या दौर्यावरून आता भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी ऐन नवरात्रीत (Navratri 2024) कोल्हापूरला येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, यावरुन काँग्रेस (Congress) किती हिंदुद्वेषी आहे हे कळाले, असे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दोन दिवस दौरा होता. राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर देशातील आरक्षणाचे जनक करवीर नगरीचे विधाते छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी राहुल गांधींनी अभिवादन केले. मात्र त्यांनी कोल्हापूरला येऊन अंबाबाईचे दर्शन घेतले नाही. यावरून भाजपने आता निशाणा साधला आहे.
तुषार भोसलेंची राहुल गांधींवर टीका
तुषार भोसले म्हणाले की, काँग्रेस पार्टी हिंदुद्वेषी पार्टी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल राहुल गांधी ऐन नवरात्रीत कोल्हापूरला येऊन सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत. याचे कारण त्यांच्या ख्रिश्चन आईने बिंबवलेले ख्रिश्चन संस्कार तर दुसरीकडे लोकसभेला एकगठ्ठा मिळालेली मुसलमानांची मते गमावण्याची भीती आहे. महाराष्ट्रातल्या सजग हिंदूंनी काँग्रेस पार्टीचा हा हिंदू विरोधी चेहरा ओळखला पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे, अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केली आहे.
राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्याच्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिला, की हा देश सर्वांचा आहे. इथे कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखी लोक जन्माला आली नसती, तर आपलं संविधानही नसतं. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हा भाजपाच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आज सुरु असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे. या विचारधारेविरोधात शिवाजी महाराजदेखील लढले होते आणि आता याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढतो आहे. ज्याप्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला, त्याप्रमाणे आताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं नाही, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला होता.
आणखी वाचा