(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिकीट मिळालं नाही तेव्हा उद्धव ठाकरे, रश्मी वहिनींचा फोन आला, पूनम महाजन यांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय घडलं?
पूनम महाजन यांनी ठाकरे कुटंबाशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी भरभरून सांगितलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
मुंबई : राजकारण हे असं क्षेत्र आहे, जिथं कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणाच्या पडद्यावर एकमेकांचे शत्रू असलेले नेतेमंडळी वैयक्तिक आयुष्यात मात्र चांगले मित्र असतात. आतापर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नेते हसत-हसत गळाभेट करताना तुम्ही याआधीही पहिलं असेल. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan), शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यातील मैत्री हे त्याचंच उदाहरण आहे. हीच मैत्री आणि भावबंध त्यांची पुढची पिढी अजूनही सांभाळत आहे. याच महाजन आणि ठाकरे घराण्यातल्या अनोख्या नात्यावर प्रमोद महाजन यांची कन्या आणि भाजपाच्या नेत्या पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी दिलखुलासपणे सांगितलं आहे.
माझं ठाकरे परिवाराशी कौटुंबिक नातं
पूनम महाजन यांनी नुकतेच 'लल्लनटॉप' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ठाकरे-महाजन कुटुंबातील नात्याविषयी सांगितलं. तसेच 2024 सालच्या निवडणुकीत भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आलं, तेव्हा उद्धव ठाकरे यांना किती वाईट वाटलं होतं, याबाबतही त्यांनी खुलेपणाने सांगितले आहे. "माझं ठाकरे परिवाराशी कौटुंबिक नातं आहे. भाजपा तसेच शिवसेना यांच्यात युती झाली होती तेव्हा ही युती अगोदर प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे आणि नंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असं म्हणायचे," असे पूनम महाजन म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे त्यावेळी खूप दु:खी झाले
तसेच, "प्रमोद महाजन रुग्णालयात होते, तेव्हा शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे त्यांना भेटायला आयसीयूमध्ये आले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आजारी होते. प्रमोद तुम्ही बरे व्हा, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरे त्यावेळी खूप दु:खी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी होतं. आमचं हे कौटुंबिक नातं आहे. 2024 साली मला भाजपाकडून तिकीट मिळवण्यात अडचणी येत होत्या, तेव्हा उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात, मुलाखतीत पूनमसोबत असं व्हायला नको असं म्हणायचे," असंही महाजन यांनी सांगितलं.
मुलायमसिंग यादव यांचे मी आशीर्वाद घ्यायचे
"मी संसदेत होते तेव्हा मुलायमसिंग यादव यांचे मी आशीर्वाद घ्यायचे. त्यावेळी ते माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे. आपल्या प्रमोदची मुलगी आली, असं ते म्हणायचे. फारुख अब्दुला हेदेखील फार प्रेम करायचे. शरद पवारही प्रेम करायचे. ममता बॅनर्जी 2014-15 मध्ये संसदेत आपल्या खासदारांना भेटायला आल्या होत्या. त्यावेळी एक खासदार माझ्याकडे आला आणि त्याने मला ममता बॅनर्जींनी बोलवलं आहे, असं सांगितलं. ममता बॅनर्जी यांनीही त्यावेळी मला प्रेमाने मिठी मारली होती," अशा आठवणीही महाजन यांनी सांगितल्या.
छोट्या-छोट्या गोषींवरूनही आमचं बोलणं होत राहतं
"तिकीट मिळालं नाही तेव्हा, मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा फोन आला होता. आमच्यात बोलणं होत राहतं. विशेषत: रश्मी ठाकरे यांच्याशी माझं सतत बोलणं होत राहतं. रश्मी ठाकरे आणि माझ्यात फार चांगले संबंध आहेत. आमचं फोनवर बोलणं होत राहतं. घरातील छोट्या-छोट्या गोषींवरूनही आमचं बोलणं होत राहतं. संभाषणात राजकारणच असलं पाहिजे असं काही नाही. मी उद्धव ठाकरे यांना दादा म्हणते. आयुष्य, वारसा आणि कॉफीवर आम्ही फार बोलतो," अशा बाबी पूनम महाजन यांनी उलगडून दाखवल्या.
हेही वाचा :