माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
मधुरिमाराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला? याबाबत विचारले जात होते.
कोल्हापूर : राज्यात सध्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) या मतदारसंघाची महाराष्ट्रभर चर्चा आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या अचनाकपणे घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कोल्हापूरचे काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांनीदेखील या निर्णयानंतर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला? खासदार शाहू महाराजांना नेमका कोणाचा फोन आला होता? याबाबत नवी माहिती समोर आली आहे.
शाहू महाराजंना नेमका कोणाचा फोन आला होता?
कोल्हापूर पालिकेतील माजी नगरसेवक सुनिल मोदी यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींविषयी माहिती दिली आहे. शाहू महाराजांनी मधुरिमा राजे यांचा अर्ज मागे का घेतला? याबाबतही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहू महाराजांनी सामान्य कार्यकर्त्यासाठी मधुरिमाराजे यांची उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे. शाहू महाराज राजेश लाटकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी लाटकर यांनी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणार का? असा प्रश्न शाहू महाराज यांना केला होता, अशी माहिती सुनिल मोदी यांनी दिली.
...त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे
तसेच काल (5 नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता लाटकर यांच्या वडिलांचा शाहू महाराज यांना फोन आला होता. माझ्या मुलाला न्याय देणार होता त्याचं काय झालं? असा प्रश्न त्यांनी शाहू महाराज यांना केला होता. यानंतर तातडीने शाहू महाराज यांनी मधुरिमा राजे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. सामान्य कार्यकर्त्याला शाहू महाराजच न्याय देऊ शकतात. यासंदर्भात सतेज पाटील यांना 2 वाजून 26 मिनिटांपर्यंत माहिती नव्हती, अशी माहिती सुनिल मोदी यांनी दिली.
सतेज पाटील यांची आताची भूमिका काय?
दरम्यान, या सर्व प्रकारावर सतेज पाटील यांनी शाहू महाराजांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच काही तासांच्या आत शाहू महाराज आणि सतेज पाटील एका मंचावर दिसले. आज सतेज पाटील यांनी कालच्या प्रकारावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आता मी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना पाठिंबा देणार आहे.
Kolhapur North News :
हेही वाचा :