(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane: आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचं असतं तर एकही घरापर्यंत पोचू शकला नसता: नारायण राणे
bjp vs Thackeray camp clash in Sindhudurg: राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा. नारायण राणे आणि निलेश राणे संतापले. शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर इथे कशाला आलात? बाहेरच्या लोकांना का सोडले?
सिंधुदुर्ग: राजकोट किल्ल्यावरील ठाकरे गट आणि राणे समर्थकांमधील जोरदार राड्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. तब्बल दीड तास राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरु होती. या राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राड्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा नारायण राणे यांनी म्हटले की, आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का?, असे नारायण राणे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे हे आमच्यामुळे राजकोट किल्ल्यावर राडा झाला, असे म्हणतात. पण राड्यामुळेच शिवसेना नावारुपाला आली. तेव्हा आदित्य ठाकरे शेंबडा होता, उद्धव ठाकरेंनाही काही माहिती नव्हते, ते इकडे नव्हते, असे नारायण राणे यांनी म्हटले.
या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात. त्यांच्यासाठी शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्त्व हे म्हणजे पैसे कमावण्याचे साधन आहे. उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत एकतरी पुतळा उभारला आहे का? त्यांना शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारी नाही. त्यांना बोलता येत नाही. शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोकणसाठी काय केले? कोकणातील किती लोकांना नोकऱ्या दिल्या, किती प्रकल्प आणले, किती पूल बांधले, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
जोरदार वााऱ्यांमुळे पुतळा कोसळला, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा पुरावा काय? राणेंचा सवाल
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. या पुतळ्याचं आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले होते. मात्र, ऐन पावसाळ्यात जोरदार वाऱ्यांमुळे हा पुतळा कोसळला. मी यामध्ये कोणावर दोषारोप करण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला त्या टेक्निशियन लोकांची चौकशी व्हावी, अशी मागणी करतो. कशामुळे हा पुतळा कोसळला, याचे कारण बाहेर यावे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, ही माझी इच्छा असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले.
विधानसभा निवडणूक समोर असल्याने विरोधक या मुद्द्याचे भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात त्यांना भाजपवर टीका करण्यासारखं काही कारण मिळत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं निमित्त करुन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट हे तिन्ही पक्ष याठिकाणी आले होते. आजपर्यंत हे पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला कधी आले नाहीत. यापैकी कोणत्याही नेत्याने एकतरी पुतळा उभारला आहे का? शिवाजी महाराजांच्या उभारणीत भ्रष्टाचार झाला, तो निकृष्ट दर्जाचा होता, याचा एकतरी पुरावा आहे का? हा पुतळा लवकरात लवकर उभारावा आणि दोषींवर कारवाई करावी, या दोनच आमच्या मागण्या आहेत. यापलीकडे आम्हाला राजकारण करायचं नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
आणखी वाचा