Ajit Pawar: चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे कमी मतं पडली, अजित पवारांच्या टिप्पणीची चर्चा
Maharashtra Politics: 'शरद पवारांना बारामतीमधून संपवणार' आणि 'भटकती आत्मा' या दोन वक्तव्यांमुळे बारामती लोकसभेच्या मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता अजित पवारांनी केलेले वक्तव्य खूप काही बोलून जाणारे आहे.
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मला कोणी विचारणा केली तर, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बारामतीमध्ये येऊन केलेल्या वक्तव्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याची तक्रार मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे करणार आहे, असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या बैठकीत अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी हे वक्तव्य गंमत म्हणून केले, असे बैठकीला उपस्थित असलेल्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अजितदादांचा स्वर थट्टेचा असला तरी यानिमित्ताने त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवल्याचे, असे काहीजणांचे मत आहे.
एका मराठी दैनिकाच्या वृत्तानुसार, अजित पवारांनी पुण्यातील महायुतीच्या बैठकीत हे वक्तव्य केले. बारामती लोकसभा मतदारसंघात 2019 च्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.54 टक्के मतदान झाले होते, तर या निवडणुकीत मतदानाचा टक्का 59.50 टक्के इतका राहिला. दोन टक्क्यांनी घटलेले हे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महायुतीच्या बैठकीत म्हटले की, 'अलीकडे कोणाला भाषण करायला लावण्याची भीती वाटते'. अजितदादांचे हे वक्तव्य बारामतीत झालेल्या कमी मतदानाच्या अनुषंगाने होते. त्यामुळे अजितदादांनी गंमतीत का होईना पण चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल केलेल्या या टिप्पणीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत पाटील बारामतीत नेमकं काय म्हणाले?
महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते.
मोदींकडून पवारांचा 'भटकती आत्मा' उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता. मोदींच्या या वक्तव्याचा बारामतीमध्ये नकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा आहे. याविषयी अजित पवार यांना विचारण्यात आले तेव्हा, मोदीजी 'भटकती आत्मा' कोणाला बोलले, हे मला माहिती नाही. मी पुढच्यावेळी त्यांना विचारुन सांगतो, असे सांगत अजितदादांनी वेळ मारुन नेली होती.
आणखी वाचा