(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi Lok Sabha: सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास, तिसऱ्यांदा पक्षाकडून संधी; भिवंडी लोकसभेसाठी भाजपकडून कपिल पाटील रिंगणात
Bhiwandi Lok Sabha: भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये भिवंडी लोकसभेचे (Bhiwandi Lok Sabha Election 2024) विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister of State Kapil Patil) यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली.
Bhiwandi Lok Sabha Election 2024: भिवंडी : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात (Maharashtra News) सर्वप्रथम उमेदवार जाहीर करण्यामध्ये भाजपनं (BJP) आघाडी घेतली. भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये भिवंडी लोकसभेचे (Bhiwandi Lok Sabha Election 2024) विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister of State Kapil Patil) यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीनंतर भिवंडीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या निवडीचे स्वागत सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांनी केलं. कपिल पाटील आपल्या निवासस्थानी दाखल होताच कपिल पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
भिवंडी लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्याबद्दल कपिल पाटील यांनी या सर्वांचे आभार मानले. भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असंख्य विकास कामांच्या माध्यमातून तब्बल कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून सदृश्य कामांच्या माध्यमातून विकास घडवून आणला आणि त्यामुळे या मतदारसंघातील नागरीक नक्कीच या मतदार संघाची सेवा करण्याची संधी मला देतील, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. देशाच्या विकासासाठी भिवंडी लोकसभेतील नागरिक मला प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, असं सांगत, विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नसल्यानं ते फक्त आरोप करत आहेत, असा आरोपही यावेळी कपिल पाटील यांनी केला आहे.
कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास?
कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्यानं त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा आगामी लोकसभेसाठी भाजपकडून कपिल पाटील यांना संधी देण्यात आली आहे. अशातच पक्षानं दिलेल्या संधीचं कपिल पाटील पुन्हा एकदा सोनं करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.