Ajit Pawar: बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, आईला सोबत आणलं अन्...
Maharashtra Politics: बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार सुरु होता. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली होती. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे, असे अजितदादांनी सांगितले.
बारामती: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडणार आहे. शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर उभे ठाकल्याने गेल्या काही दिवसांपासून बारामतीचे राजकारण प्रचंड तापले होते. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. बारामतीच्या या लढाईत पवार घराण्यातील सर्वजण शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने अजित पवार काहीसे एकाकी पडल्याचे चित्र होते. अगदी अजित पवार (Ajit Pawar) यांची आईही त्यांच्या निर्णयावर नाखूश असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मंगळवारी मतदान करताना एक मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे.
अजित पवार हे जेव्हा मतदानाला आले तेव्हा त्यांची आई आशाताई अनंतराव पवार या त्यांच्यासोबत होत्या. या दोघांनीही मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अजितदादांनी आपली आई सोबत आल्याचा उल्लेख आवर्जून केला. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. त्यांनी हे वक्तव्य करुन एका दगडात दोन पक्षी मारले. एकीकडे माझी आई घराण्यात सर्वात ज्येष्ठ असल्याचे अधोरेखित करुन शरद पवार यांना टोला लगावला. तर दुसरीकडे माझी आई मतदानाला माझ्यासोबत आल्याचे सांगत ती माझ्याच बाजूने असल्याचा संदेशही अजितदादांनी दिला.
मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकीची आणि गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षांचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा, याची आठवण अजित पवारांनी पुन्हा एकदा करुन दिली.
श्रीनिवास पवार काय म्हणाले होते?
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तेव्हा श्रीनिवास पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे अजित पवार यांची आईही त्यांच्यासोबत नसल्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मतदानाला येताना आईला सोबत आणत विरोधकांच्या आरोपांमधील सर्व हवाच काढून घेतली.
आणखी वाचा