मी मराठीत बोललो, शिवीगाळ केलेली नाही, तक्रारीला कायदेशीर पद्धतीनं उत्तर देऊ; व्हायरल व्हिडीओनंतर दत्तात्रय भरणेंनी थेट सांगितलं
आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती अॅग्रोचा (Baramati Agro) कुणीही येणार नसल्याचं दत्ता भरणे म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.
Datta Bharne On Viral Video : इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत आमदार भरणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती अॅग्रोचा (Baramati Agro) कुणीही येणार नसल्याचं दत्ता भरणे म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. याबाबत एबीपी माझानं दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया जाणून घेतली.
मी मराठीत बोललो, शिवीगाळ केलेली नाही : दत्तात्रय भरणे
व्हायरल व्हिडीओबाबत दत्तात्रय भरणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की, "मी माझ्या मराठी भाषेत बोललो, पण मी शिवीगाळ अजिबात केलेली नाही. आज मतदान असल्यामुळे मी मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथे कार्यकर्त्यांचं भांडण दिसलं. मी तिथे गेलो, त्यावेळी बारामती अॅग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता. त्यानं माझ्या विरोधातही शब्द वापरले. मीसुद्धा माणूस आहे, मी त्याला विचारलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, गावकरी त्याच्यावर धावून आले. जर मी तिथे नसतो तर अनर्थ घडला असता. गावकरी त्याच्यावर धाऊन गेले असते. पैशाचे वाटप तो करत होता. माझ्या मराठी भाषेत मी बोललो. कोणताही राजकीय हेतू नव्हता."
मी दबाव टाकतोय असं वाटत असेल तर, व्हिडीओमध्ये जे दिसतायत त्यांना विचारा : दत्तात्रय भरणे
निवडणूक आयोगात दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचंही तक्रारीत म्हटलं गेलं आहे. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "मी दबाव टाकत असेल, असं वाटत असेल तर व्हिडीओमध्ये जे लोक दिसत आहेत. त्यांचे जबाब नोंदवा. त्यांना विचारा, तिथे पैशाचं वाटप कोण करत होतं, नोकऱ्यांचं आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगातही मी हेच सांगीन. तक्रारीला कायदेशीर पद्धत्तीनं उत्तर देईन."
"इंदापूर तालुक्यात चांगल्या पद्धत्तीने मतदान घड्याळाला होणार आहे. सहानंतर लोकांच्या विकासकामं, दुखलं खुपलं हे आम्हीच बघू. तो बारामती एग्रोचा कर्मचारी आहे. तो कार्यकर्ता नाही. काम करणारा माणूसच चिडतो. असं काही झालं असेल तर मी दिलगिरी पण व्यक्त करतो.", असंही दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : Dattatray Bharne Shivigal : आधी शिवीगाळ, नंतर दिलगिरी; दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
महत्त्वाच्या इतर बातम्या :