(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashok Chavan Political Heir : माझ्या मुली राजकारणात येण्यास इच्छुक, हा निर्णय मी त्यांच्यावर सोपवलाय, त्या निर्णय घेतील : अशोक चव्हाण
Ashok Chavan Political Heir : "माझ्या मुली राजकारणात येण्यास इच्छुक दिसतात. हा निर्णय मी त्यांच्यावर सोपवला आहे. योग्य वाटलं तर त्या निर्णय घेतील," असं अशोक चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan Political Heir : महाराष्ट्रात जेव्हापासून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो पद यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु झाली तेव्हापासून "भारत जोडो"पेक्षा जास्त चर्चा ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजकीय वारस कोण? याची होताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाणचे (Shreejaya Chavan) झळकलेले बॅनर आणि देगलूरपासून राहुल गांधी यांच्यासोबत या पदयात्रेत खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करत असलेल्या सुजया चव्हाण (Sujaya Chavan). यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या मुली राजकारणात येण्यास इच्छुक दिसतात. हा निर्णय मी त्यांच्यावर सोपवला आहे. योग्य वाटलं तर त्या निर्णय घेतील," असं अशोक चव्हाण म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते.
अशोक चव्हाणांच्या लेकी भारत जोडो यात्रेत
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून 7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. भारत जोडो यात्रेत नांदेडमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिचे बॅनर झळकले. तर सुजया चव्हाण या देगलूरपासून राहुल गांधी यांच्यासोबत या पदयात्रेत खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करत होत्या. आज तिसऱ्या दिवशी सकाळीही सुजया तेवढ्याच जोशाने आणि त्वेषाने राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रा पादाक्रांत करत आहेत.
अशोक चव्हाण यांचं ट्वीट
यादरम्यान अशोक चव्हाण यांनी आज केलेलं ट्वीट हे फार बोलकं आहे. ज्यात त्यांनी असं लिहिलं आहे की, "पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार," असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं,
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 8, 2022
त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो,
आणि आभाळात झेप घेण्यासाठी
जेव्हा ती सज्ज होऊ लागतात,
तेव्हा पाखरांना होणारा आनंद
अवर्णनीय असाच रहात असणार.#BharatJodoYatra #मी_पण_चालणार pic.twitter.com/CNRj3vrEWr
मी निर्णय मुलींवर सोपवलाय : अशोक चव्हाण
याविषयी विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले की, "आमच्या दोन पिढ्या राजकारणात आहेत, तिने स्वतः होऊन भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला आहे. दरम्यान माझं कुटुंब एक राजकीय कुटुंब आहे, शंकरराव चव्हाण यांच्यापासून वर्षानुवर्षे काम केलेले आहे. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. दरम्यान आज माझ्या मुलींना कोणतंही राजकीय पद नाही अथवा त्यांचा थेट सहभाग नाही. त्यांना या यात्रेत सहभागी होणं योग्य वाटलं आणि त्यांची ती आवड आहे. दरम्यान त्यांनी या यात्रेत सहभाग नोंदवत राहुल गांधी यांच्यासोबत चालल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी याचा आनंद घेतला. राजकारणात येण्यास त्या इच्छुक दिसतात. त्यामुळे हा निर्णय मी त्यांच्यावर सोपावला आहे. त्यांना योग्य वाटलं तर त्या निर्णय घेतील. यात माझा कोणताही निर्णय नाही."
सुजया चव्हाण राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
उद्या 10 नोव्हेंबर रोजी नांदेड इथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत सुजया चव्हाण यांची राजकीय भूमिका आणि आगमन स्पष्ट होईल या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात एका मोठ्या राजकीय घराण्यातील आणि देशाचे माजी गृहमंत्री, जलनायक शंकरराव चव्हाण यांची नात ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राजकीय वारस असेल का? या विषयीची उत्सुकता येत्या काळात संपेल असं चित्र आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून 7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली. आज बिलोली तालुक्यातील कृष्नूर ते नायगाव असा सकाळच्या सत्रातील टप्पा पार करुन नायगाव या ठिकाणावरुन 4:00 वाजता ही यात्रा नांदेडकडे मार्गक्रमण करेन.
संबंधित बातमी
Ashok Chavan :अशोक चव्हाणांचा राजकीय वारस कोण? भारत जोडो यात्रेत चर्चेला उधाण