एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...
अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपात प्रवेश केला, तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसकडून ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत
नांदेड : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil) यांनी अखेर भाजपला सोडण्याचा निश्चय केला असून आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. त्यावेळी, पुढील विधानसभा निवडणुकांसाठीची रणनीती आणि मतदारसंघातील राजकारण यावर भाष्य केलं. तसेच, काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी काल विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत, असे म्हणत तुतारी फुंकण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. एकेकाळी काँग्रेस पक्षात त्यांचे सहकारी असलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर स्पष्टपणे भाष्य केलंय.
अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपात प्रवेश केला, तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसकडून ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. त्यामुळे, काँग्रेसमध्ये त्यांच्यासमवेत काम केलेल्या नेत्यांची मोठी यादी आहे. भाजपातून राष्ट्रवादीमध्ये जाणार असलेले हर्षवर्धन पाटील हेही काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे, एकेकाळचे अशोक चव्हाण यांचे सहकारी असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावर अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता, इंदापूरची राजकीय परिस्थिती जी आहे, त्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेतला असेल. तो मतदार संघ अजित पवार यांचे निकटवर्तीय सध्या तिथे आमदार आहेत. त्यामुळे, स्वाभाविक आहे, तिकडे भाजपला जागा मिळणे कठीण आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असावा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
विरोधकांना चिमटा
मी माझ्या राजकीय विरोधकांना एवढेच सांगेन की, तुमचं अस्तित्व टिकायचं असेल तर माझं सुद्धा टिकू द्या, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जिल्ह्यामध्ये बरीचशी मंडळी फक्त अशोक चव्हाणवर टीका करून जगत आहे, त्यांना उद्देशून मी बोललेलो आहे. मी राहिलो तरच तुम्ही राहाल, असा चिमटा चव्हाण यांनी विरोधकांना काढला.
नरहरळी झिरवळांच्या उडीवर प्रतिक्रिया
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मंत्रालयातील जाळीत उडी मारल्याबाबतही अशोक चव्हाण यांना भूमिका मांडली. ''घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने थोडा संयम पाळायला पाहिजे. त्यांनी जर एखादी गोष्ट सांगितली की, ते कोणी ऐकणार नाही असं कधी होत नसते. त्यांना काहीतरी गैरसमज झाला असेल असं मला वाटतंय. जे घडलं ते योग्य नाही,'' असे चव्हाण म्हणाले.
शरद पवार यांना कायदेशीर सर्व गोष्टी माहित
आरक्षण 50 टक्के वरून 75 पर्यंत जाऊ द्या, ज्यांना मिळालेले नाही त्यांचा 25 टक्केंमध्ये समावेश करता येईल. केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आम्ही त्याबद्दल पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यावरही चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ''शरद पवार यांना कायदेशीर सर्व गोष्टी माहित आहेत, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळालेले आहे. अद्याप ते कुठल्याही कोर्टाने प्रतिबंध केलेलं नाही, आता उर्वरित आरक्षणाचा विषय कायदेशीर विषयात आहे. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्यावर अधिक भाष्य करणार नाही. राज्य शासनाने त्यांचा प्रस्ताव कितपत उचित आहे, हा विचार करावा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
हेही वाचा
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त