(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Andheri By Election: अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येईल: अनिल परब
Andheri By Election: अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येणार आहे.
Andheri By Election: अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता याच जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक सोबत मिळून लढवणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले आहेत की, ''अंधरेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येणार.'' या पत्रकार परिषदेला परब यांच्यासोबत काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि राष्ट्रवादीच्या राखी जाधव देखील उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, ''आज सकाळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप, अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पाठिंबा जाहीर केला. यासोबतच राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. म्हणून 3 नोव्हेंबर रोजी होणारी ही पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढली जाईल.''
अनिल परब यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीचा उमेदवार 13 तारखेला गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सकाळी 11 वाजता हा अर्ज भरला जाईल, यावेळी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहणार आहे, अशी माहितीही परब यांनी यावेळी बोलताना दिली.
ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह कधी मिळणार? याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता परब म्हणाले आहेत की, अद्याप निवडणूक चिन्हांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आम्ही देखील याची वाट पाहत आहोत. अर्ज भरण्याची तारखी जवळ आली आहे. यामुळे आम्हाला त्याअगोदर चिन्ह मिळावं, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आज रात्री किंवा उद्या रात्रीपर्यंत चिन्ह मिळेल, अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले आहेत.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला चिन्हासाठी तीन पर्याय सुचवले आहेत. यावर ते म्हणाले की, आम्ही सुचवलेल्या तीन पर्यायांपैकी निवडणूक आयोगाला कुठलाही आक्षेप नसला, तसेच तेच चिन्ह दुसरं कोणी मागितलं नसेल. तर आम्ही निवडणूक आयोगाच्या अनुक्रमानुसार आम्ही चिन्ह सुचवलं आहे. त्यातलं नंबर एकचं त्यांनी आम्हाला द्यावा, असं ते म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या