Amravati Loksabha Election : निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर; अमरावती मतदारसंघात चर्चेला उधाण
Amravati Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचा अंतिम निकाल लागण्यास आता अवघे काही तास शिल्लक असतानाच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत.
Loksabha Election Result News : देशभरात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election 2024) सांगता झाली आहे. आता साऱ्यांना वेध लागले आहे ते 4 जून अर्थात अवघ्या काही तासांनी लागणाऱ्या निकालाचे. या निकालाची मोठी उत्सुकता आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना देखील लागली आहे. अशातच विदर्भासह राज्यात कायम चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांच्या नजारा लागल्या आहे. मात्र अंतिम निकाल लागण्यास आता काही तास अवकाश असतानाच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विजयाचे बॅनर लागले आहे. हे बॅनर सध्या सऱ्यांचे लक्ष वेधत असून त्यामुळे अनेक चर्चानाही उधाण आले आहे. तर दुसरीकडे किती हा आत्मविश्वास, असे शब्दही काहींच्या तोंडून निघत आहे.
निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर
अमरावती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अशा आशयाचे हे बॅनर असून ते अमरावतीच्या राजकमक चौकात झळकले आहेत. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे खाजगी सचिव अवि काळे यांच्या मार्फत हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नवनीत राणा यांचा उल्लेख हिंदू शेरणी म्हणून करण्यात आला असून त्यावर आमदार रवी राणा, नवनीत राणा, खाजगी सचिव अवि काळे यांच्या सह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो देखील दिसून येत आहे.
मोदींसोबत जाण्यासाठी उध्दव ठाकरेंच्या परिवाराचे एकमत
तर दुसरीकडे नवनीत राणा ह्या शंभर टक्के मोठ्या मतांनी निवडून येतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवनीत राणा यांचे काम केलं, असा खळबळजनक दावाही नवनीत राणा यांनी केला आहे. पुढे बोलतांना त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करत त्यांची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. त्या सिव्हिल वॉरची भाषा करत आहे. तसेच काँग्रेस आणि त्यांना निकालाविरोधात राज्यात दंगे करायचे असल्याचा आरोपी त्यांनी केलाय. तर मोदींसोबत जाण्यासाठी उध्दव ठाकरेंच्या परिवाराचे एकमत झाले आहे. निकालानंतर ते मोदी यांच्या सोबत जातील आणि येणाऱ्या काळात शरद पवार देखील मोदी यांना पाठिंबा देतील, असे मोठे विधानही त्यांनी यावेळी केले आहे.
अमरावती मतदारसंघात उद्या 20 फेऱ्यामध्ये मतमोजणी
अमरावती लोकसभा मतदारसंघातील लोकशाही भवनात उद्या सकाळी 8 पासून मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यासाठी 18 टेबल म्हणजे एकूण 108 मतमोजणी होईल. तर एका फेरीला किमान 30 ते 35 मिनिटांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे अश्या 20 फेऱ्या असल्याने निकालाला किमान 8 तास लागण्याची शक्यता आहे. 6 विधानसभा मतदारसंघातील 108 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी होणार.
यामध्ये अमरावती, तिवसा, अचलपूर मतदारसंघात 18 राऊंड. तर बडनेरा आणि दर्यापूर साठी 19 राऊंड आणि मेळघाट मतदारसंघात 20 राऊंड होणार आहेत. यावेळी अमरावती लोकसभेसाठी 63.67 टक्के मतदान झाले असून 11 लाख 69 हजार 121 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महत्वाच्या उमेदरांच्या घरासमोर आणि प्रत्येक चौकात पोलीसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त यांनी एबीपी माझाला दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या