Amit Shah : ठाकरे-पवारांच्या पक्षाचा पाया संपवून टाकायचाय, अमित शाह कोल्हापुरात कडाडले; बाहेरुन पक्षात येणाऱ्यांवरही बोलले
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरातील सभेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
Amit Shah, कोल्हापूर : "शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेवलवरच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडायचं आहे. तुम्हाला वाटत असेल बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल पण असं काही होणार नाही. गेली दहा-पंधरा वर्ष पक्षाशी जोडले गेलेल्यांना पक्षाने काही दिलं नाही. ठाकरे-पवारांच्या पक्षाच्या पाया आपल्याला समाप्त करायचा आहे", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. कोल्हापुरातील सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही पण न मागणाऱ्याला शोधून देतो
अमित शाह म्हणाले, दहा वर्षात तुम्हाला काही मिळालं नाही तर काल येणारा कसं घेऊन जाईल? महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत आणायचा असेल तर विरोधकांचा पाया कमकुवत केलाच पाहिजे. पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही पण न मागणाऱ्याला शोधून देतो. आपल्याला कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ तिन्ही चिन्ह एकच मानून काम केलं पाहिजे. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण आहे.
लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे कार्यकर्ते थोडे उदास झाले
2024 ला भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे सरकार आणायचं हा संकल्प घेऊन आपण सगळे इथे आला आहात. लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे कार्यकर्ते थोडे उदास झाले. मात्र आपण राजकीय कार्यकर्ते आहोत आपल्याला राजकीय विज्ञान आणि गणित समजलं पाहिजे. आज लोकसभेत सत्ताधारी गटाच्या बाकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर विरोधकांच्या बाकावर राहुल गांधी आणि त्यांची टीम आहे. मग आता सांगा ही निवडणूक कोण जिंकलं? असा सवालही शाह यांनी केला.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक नेता सलग तीन वेळा निवडणुका जिंकून पंतप्रधान झाला. मात्र माहित नाही का आपण सगळेच जण लोकसभा निवडणुकीनंतर उदास होऊन बसलो आहोत. राहुल गांधी..तुम्ही आणि तुमचे मित्र पक्ष मिळून जेवढ्या जागा आहेत तेवढ्या एकट्या भाजपच्या जागा आहेत. राहुल बाबा..तुम्ही हे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातील हे सर्वात मोठे यश आहे,यानंतर भारतीय जनता पार्टी ही संधी तुम्हाला देणार नाही.
निवडणुकीत अपयश आल्यानंतर निराश ते लोक होतात जे पद मिळवण्यासाठी निवडणूक लढवतात
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उदास झाले आहेत. आम्ही असे यश अपयश खूप पाहिले. आमचं तारुण्य पक्षाच्या अपयशात गेलं. निवडणुकीत अपयश आल्यानंतर निराश ते लोक होतात जे पद मिळवण्यासाठी निवडणूक लढवतात. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशाला सुरक्षित करण्यासाठी निवडणूक लढवतात. पक्षाची सुरुवात करताना हा विचार सुद्धा केला नव्हता की पक्ष सत्तेत येईल मात्र आमचा संघर्ष सुरू राहिला आणि अखेर यश आलं. आमची सत्ता येताच 370 कलम हटवलं, राम मंदिर बांधले cca कायदा आणला, असं अमित शाह यांनी सांगितलं.
राहुल बाबा...तुम्ही किती ही विरोध करा आम्ही वक्त बोर्डाचा कायदा आणणार म्हणजे आणणारच आहोत. भारताच्या मूळ विचार धारेला आम्ही देशाची अस्मिता बनवलं आहे. नक्षलवाद आतंकवाद आपण दहा वर्षात पूर्णतः संपवला आहे. आम्हाला भारत मातेचा आशीर्वाद आहे,त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत आम्हाला कोणीच हरवू शकत नाही. विरोधकांच्या रणनीतीला बारकाईने उत्तर आपण दिले पाहिजे. मी इथे भाषण द्यायला आलो नाही तुम्हाला काम द्यायला आलो आहे, असंही शाह म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Mumbai Rain : मुंबई-उपनगरात उद्याही कोसळधारा, अतिमुसळधार पावसाचा इशारा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन