Mumbai Rain : मुंबई-उपनगरात आजही कोसळधारा, अतिमुसळधार पावसाचा इशारा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन
Mumbai Rain Update : गुरूवारीही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून आज (गुरूवार) सकाळी 8.30 पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यासह परिसरात गुरूवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारीही मुंबईकरांना मुसळधार पावसाला सामोरं जावं लागणार आहे.
आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा
मुंबईतील अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
लोकल सेवा ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी
मुंबईत बुधवारी दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकल सेवेवर झाल्याचं दिसलं. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती. विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
अंधेरी, गोरेगावमध्ये पावसाची बॅटिंग
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याचं दिसतंय.
महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईला देण्यात आलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी सर्व उपयुक्तांना, वॉर्ड अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून तातडीने आपल्या वॉर्डमध्ये मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत असतील तर त्या सोडवाव्यात. सर्व उपयुक्तांनी आपल्याकडे दिलेल्या झोनमध्ये होत असलेल्या कामांवर आणि येत असलेल्या अडचणींवर विशेष लक्ष ठेवावे. जिथे जिथे पाणी साचत असेल तिथे पंपाने पाण्याचा निचरा तातडीने करण्यास उपाययोजना कराव्यात. त्याशिवाय काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तातडीने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रात्रभर काम करावे व आपल्या कार्य कक्षेत विशेष लक्ष ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या सगळ्याचे अपडेट नियंत्रण कक्षास देत राहावे , अशा प्रकारच्या विशेष सूचना मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.