Ajit Pawar : शेवटी योग पण जुळून यावा लागतो, आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हावं कुठं जमतंय, महिला मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर अजित पवार याचं भाष्य
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या चर्चेवर भाष्य केलं. ते वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात बोलत होते.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 मे ते 4 मे दरम्यान मुंबईतील वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं याचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या एका वक्तव्यावर भाष्य करताना आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हाव मात्र योग कुठे आलाय, असं म्हटलं. आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, धावपटू ललिता बाबर, नेमबाज राही सरनोबत,ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
जागतिक कामगार दिन हा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, असे राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं पण शेवटी मात्र योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हावं कुठं जमतंय. कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही, अजित पवार यांनी म्हटलं. ते पुढं म्हणाले जसं ममता बॅनर्जी झाल्या, जयललितांनी स्वत:च्या ताकदीवर तामिळनाडूत अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं बघितलं. त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे पाहिलं. त्या अम्मा म्हणून प्रसिद्ध होत्या. कित्येक महिलांची नावं देशातील वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली घेता येतील. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही ते होईल, कारण हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता जिजाऊंचा,सावित्रीबाई फुले, रमाई माता, ताराराणींचा महाराष्ट्र आहे. या अशा अनेक महिला या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत, त्यांचं कर्तृत्व महिलांनी बघितलं आहे, त्यामुळं तो दिवस फार लांब असेल, असं मला वाटत नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
मनभेद होता कामा नये
राज्यात अनेक पक्ष होऊन गेले, अनेक वेळा वैचारिक मतभेद झाले मात्र मनभेद कुणाशी होता कामा नये. राज्यातील सर्व नेत्यांनी राजकीय सौहार्द पाळलं पाहिजे. अनेक नेत्यांमधील राजकीय पक्षापलीकडं जाऊन मैत्रीची उदाहरणं पाहिली आहेत.महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्री गौरव आम्ही उद्या करणार आहोत. हा राज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.
आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान आज केला आहे. महिलांनी आज पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण, क्रीडा, उद्योग, राजकारण अशा सर्व क्षेत्रात यश मिळवलं आहे. महाराष्ट्रानं नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हाच वारसा पुढं नेण्याचं काम करतोय, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
आम्ही पण महिलांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री यांनी महायुती सरकारचा १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता त्यात अदिती तटकरे यांच्या खात्याला पहिला क्रमांक मिळाला. महिला कुठं मागं नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं. माझं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच १ खातं ३५ टक्क्याच्या खाली आहे. आम्हाला त्यावर काम करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.























