ज्या काही योजना चालू असतात, त्या सगळ्याच कायमच्या चालतात असं नाही; अजित पवारांचं वक्तव्याने उंचावल्या भुवया
अनेक ठिकाणी अजूनही बिकट परिस्थिती असताना दिवाळीच्या तोंडावर 'आनंदाचा शिधा ' मिळण्याची आशा आता भंग झालीय . त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे

Ajit Pawar: यंदा आर्थिक अडचणींमुळे दिवाळीत 'आनंदाचा शिधा' मिळणार नसल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . ' ज्या योजना चालू असतात, त्या सगळ्याच कायम चालतात असे नाही . आनंदाचा शिधा ठराविक लोकांनाच मिळायचा .पण लाडक्या बहिणीचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो . लाडक्यांना मिळतो .' असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत .
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 'आनंदाचा शिधा ' ही योजना सुरू करण्यात आली होती . राज्यात अतिवृष्टी, पूर परिस्थितीनं शेतकऱ्यांच्या हातात तोंडातील घास हिरावला गेला .अनेक ठिकाणी अजूनही बिकट परिस्थिती असताना दिवाळीच्या तोंडावर 'आनंदाचा शिधा ' मिळण्याची आशा आता भंग झालीय . त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे .
Ajit Pawar On Aanandacha Shidha: काय म्हणाले अजित पवार ?
"ज्या काही योजना सुरू असतात, त्या योजना कायमच्याच चालतात अशातला भाग नाही .त्या त्या वेळेस ची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही बदल केले जातात. आता आनंदाचा शिधा मिळत असताना तो ठराविक लोकांनाच मिळायचा .पण लाडक्या बहिणींचा पैसा हा जास्त माझ्या बहिणींना मिळतो .माझ्या लाडक्यांना मिळतो. सगळ्या चांगल्या योजनांच्या बाबतीत महायुती सरकार सकारात्मक आहे .अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळायला पाहिजे तो जर पोहचू शकत नसेल तर त्यामध्ये काही बदल आपण करत असतो .हे आजचं नाही . स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे .अनेक योजना याआधीही आल्या .काही बंद केल्या .काही योजनांमध्ये बदल केले .काही योजना आणखी लोकाभिमुख केल्या .त्या पद्धतीने याही बद्दल मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे . " असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले .
राज्याच्या तिजोरीवर ताण, लोकप्रिय योजना बंद होण्याच्या मार्गावर ?
विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजना सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना मोफत वीज आनंदाचा शिधा ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थाटन अशा अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा महायुती सरकारने केली होती .निवडणुकीनंतर सत्तेवर येताच तिजोरीवर 'आर्थिक ताण ' आल्याने या योजनांना कात्री लावण्यास सुरुवात झाली असून काही योजना निधी उपलब्ध नसल्याने आता फक्त कागदावर राहिल्या आहेत . यंदा दिवाळीत गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे .
दरवर्षी शिवजयंती गुढीपाडवा गणेशोत्सव दसरा दिवाळी अशा चार-पाच सणांसाठी शिंदे यांच्या कार्यकाळात आनंदाचा शिधा देण्यात येत होता .या योजनेवर सुमारे 602 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता . मात्र यंदा गणेशोत्सवात ही हा शिधा मिळाला नव्हता .आर्थिक अडचणींमुळे ही योजना कायमची बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .


















