Ajit Pawar & Eknath Shinde: एकनाथ शिंदे हे अमित शाहांकडे तक्रार करतील, असं वाटत नाही, आमचे संबंध चांगले आहेत: अजित पवार
Eknath Shinde & Ajit Pawar: किल्ले रायगडावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही अमित शाहांसोबत उपस्थित होते. फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी भाषणाची संधी

मुंबई: केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अर्थखात्याविषयी तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर निधीवाटपावरुन नाराजी व्यक्त केली होती. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले.
अमित शहा असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील, असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार व्यक्त केली. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही. आपण काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरु आहे. डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे, तो सुद्धा आम्ही दिला आहे. त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगितलं जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले.
रायगड किल्ल्यावर भाषण का केलं नाही? अजित पवार म्हणाले....
रायगड किल्ल्यावर शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी मिळाली. नंतर नाराजी नको म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना भाषण करायला सांगितले, अशी चर्चा होती. पण अजित पवार यांना मात्र बोलायची संधी मिळाली नाही, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी सांगितले की, रायगडावर जो अमित शहांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मला त्यांनी बोलायला सांगितलं होते. मात्र, जवळपास त्या ठिकाणी दोन वाजून गेले होते. उशीर झाल्यामुळे मीच स्वतः मुख्यमंत्री आणि अमित शहा साहेब बोला, असे सांगितल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवारांसोबतच्या भेटीवर अजितदादा काय म्हणाले?
शरद पवार आणि मी दोघे एकत्र असणार का, हे सारखं सारखं का पत्रकार बांधव उकरून काढताय. तुमच्याकडे दुसरे काही विषय नाहीत का? असे मिस्कीलपणे अजितदादांनी म्हटले. रयत शिक्षण संस्था ही सर्वांची आहे आणि साहेब या ठिकाणी अध्यक्षपद भूषवत आहेत. या संस्थेची मॅनेजिंग कौन्सिलची बैठक होती. यामुळे याठिकाणी येणं हे कर्तव्य होते. ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याचं जे आव्हान आपल्यासमोर आहे. AI ज्ञानदेखील ग्रामीण भागातल्या मुला मुलींना मिळायला हवं हीच यातील भूमिका आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
फाईली मंजूर होईनात, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार; पुण्यातील बैठकीत निशाण्यावर अजित दादा
























