(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवारांकडे परतणार, रोहित पवारांचा मोठा दावा
Rohit Pawar On Ajit Pawar : जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु असतानाच, रोहित पवारांनी हा दावा केला आहे.
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असून, अजित पवार (Ajit Pawar) गट प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोठा दावा केला आहे. “अजित पवार गटाचे 22 आमदारांना शरद पवारांकडे (Sharad Pawar) परत यायचं आहे. तर, 12 आमदारांना भाजपच्या (BJP) चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असे वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु असतानाच रोहित पवारांनी हा दावा केला आहे.
याबाबत बोलतांना अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात वाद होणारच होता. त्याबरोबरच भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात देखील वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठी खदखद असून, बऱ्याच लोकांना बीजेपीच्या चिन्हावर निवडणूक लढायची आहे. तसंच अजित पवारांच्या पक्षातील बऱ्याच आमदारांना देखील भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे. ज्यात 12 आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. तर, 22 आमदारांना पुन्हा एकदा शरद पवारांकडे परत यायचं आहे. त्यामुळे हा वाद हळूहळू वाढत जाणार आणि यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अजित पवारांच्या पक्षाचे नुकसान होणार असल्याचं रोहित पवार म्हणाले.
अन्यथा विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभं राहणार नाही...
पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "दादांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं, एक मोठा नेता, लोकांच्या मनातील लोकमत असलेला हा कुठेतरी भाजपने राजकीय दृष्ट्या संपवलं आहे. कारण भाजप नेत्याला जवळ करतो आणि संपवून टाकतो. राजकीय पक्षांना जवळ करतो आणि संपवून टाकतो. पण ते एवढ्या लवकर होईल हे माहीत नव्हतं. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना नऊ जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु 9 ऐवजी आता त्यांना चारवरच आनंद साजरा करावा लागणार आहे. लोकसभेत अशी परिस्थिती असेल तर कदाचित विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभं राहणार नाही. सर्वच भाजपच्या पक्षाकडून उभे राहतील. त्यामुळे दादाचे 12 अशी लोकं आहेत जे अजित दादांनी भाजपमध्ये जावं असं सांगत असल्याचे" रोहित पवार म्हणाले.
विजय शिवतारेंचा बोलविता धनी कोण?
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, “विजय शिवतारे सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे. त्यांचा हा जो पक्ष आहे, तो शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या राष्ट्रवादीच्या विरोधातील पक्ष आहे. त्यामुळे ते सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बोलतील, पण हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की, सत्तेत सोबत असणाऱ्या अजित पवारांबद्दल ते कसे बोलले. त्यांचं धाडस कसं झालं. अजित पवारांबद्दल त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला सांगितलं, की भाजपच्या नेत्याने बोलायला लावलं. मुद्दामून एक वाद निर्माण व्हावा असा प्रयत्न होता का?, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :