Ajit Pawar: 2100 रूपयांच्या प्रश्नावर अजितदादा भडकले; म्हणाले, 'माझ्याशी वाद घालू नका, जाहीरनामा दाखवा', व्हिडिओ व्हायरल
Ajit Pawar: अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवारांना पत्रकारांनी योजनेमधील रकमेत वाढ करण्याबाबत केलेल्या प्रश्नांवर अर्थमंत्री भडकल्याचं दिसून आलं.

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल (सोमवारी) अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या 2025-26 च्या खर्चासाठी अर्थसंकल्पामध्ये 36000 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेतून मिळाणाऱ्या रक्कम वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा राज्यातील लाडक्या बहिणींना होती. ती घोषणा मात्र अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवारांना पत्रकारांनी योजनेमधील रकमेत वाढ करण्याबाबत केलेल्या प्रश्नांवर अर्थमंत्री भडकल्याचं दिसून आलं.
नेमकं काय घडलं?
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विजय मिळाल्यानंतर लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यात 1500 रुपयांवरून 2100 रुपये वाढ करण्याबाबत जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबत अर्थसंकल्पानंतर पत्रकारांनी विचारले असता अजित पवार पत्रकारांवरतीच भडकल्याचे दिसून आले. मला जाहीरनामा दाखवा असं म्हणत अजित पवारांनी थेट पत्रकारांना आव्हान दिले आहे. त्यानंतर आता 6 नोव्हेंबर 2024 रोजी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत केलेल्या घोषणेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावरती व्हायरल होताना दिसत आहे.
विधानभवनाच्या आवारात पत्रकार आणि अजिदादांची प्रश्न, उत्तर
पत्रकार : सत्तेत आलो तर 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते.
अजित पवार : हो, आम्ही सत्तेत आलोय ना. आम्ही 2100 रुपये देण्यासंदर्भात आम्ही नाही म्हटलेलं नाहीये.
पत्रकार : जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असे म्हटले होते.
अजित पवार : लगेच देऊ असे म्हटलेले नव्हते. आहो माझं, एक उदाहरण दाखवा, दाखवा जाहीरनामा. वाद घालू नका, आम्ही सांगितले होते, पुढं आमचं सरकार आल्यावर , आम्ही त्याच्यामध्ये वाढ करू. आत्ता आमचं सरकार आलेलं आहे. पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती. ती आर्थित शिस्त लावण्याचं काम आम्ही करत आहोत. ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या, वीज माफीची आणि लाडक्या बहिणींची त्या योजनांना भरीव अशा प्रकारची तरतुद आम्ही अर्थसंकल्पात केलेली आहे.
पत्रकार : विरोधक म्हणत आहेत, दादांनी वादा पाळला नाही.
अजित पवार : माझे एक विधान दाखवा की, मी हा वादा केला होता.
सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदेत वाचलेला जाहीरनामा
6 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा घोषित केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आम्ही लाडक्या बहिणींना सध्या 1500 रुपये देत आहोत. सत्ता आल्यास त्यामध्ये 600 रुपयांची वाढ करून ते आम्ही 2100 रुपये करू, त्यामुळे आता यावरून विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी किती तरतूद?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार असं सरकारनं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

