Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Ajit Pawar Camp: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील चार जागांवर मुस्लीम उमेदवार उभे करणार. 10 टक्के जागांवर मुस्लिमांना संधी
मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचा हिंदुत्ववादी राजकारणाचा सूर टिपेला पोहोचला असला तरी महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार यांनी मुस्लीम उमेदवारांना संधी द्यायचे ठरवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात सर्वाधिक मुस्लीम उमेदवार (Muslim Candidates) उभे केले जाणार आहेत. अजितदादा गटाने महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti) त्यांच्या येणाऱ्या जागांपैकी 10 टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
अजित पवार गटाकडून सध्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. याबाबत प्राथमिक चर्चेनंतर मुंबईत चार आणि एमएमआर रिजनमध्ये आणखी 1 अशा पाच जागांवर अजितदादा गटाकडून मुस्लीम उमेदवार उभे केले जाणार आहेत. महायुतीत मुंबईत राष्ट्रवादीला चार जागा सुटणार असल्याची माहिती आहे. या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिम उमेदवार देणार आहे. तसेच प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देण्याची योजना अजितदादा गटाने आखली आहे.
मुंबईतील कोणत्या जागांवर मुस्लीम उमेदवार?
विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाकडून मुंबईतील वांद्रे, मुंबादेवी, अणुशक्ती नगर आणि शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये मुस्लीम उमेदवार दिले जाणार आहेत. तर कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातही मुस्लीम चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अणुशक्ती मतदारसंघातून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक, शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक, वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघातून नाजीम मुल्ला यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. तर मुंबादेवी मतदारसंघात अजितदादा गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.
मुस्लीम समाजाविषयीच्या नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवार नाराज
गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे मुस्लीम समाजाविषयी वारंवार आक्रमक भाषा वापरत आहेत. यावर अजितदादा गट प्रचंड नाराज आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्याचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो, असे अजितदादा गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे अजितदादा गटातील वरिष्ठ नेते नितेश राणे यांच्याविरोधात थेट भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली होती.
या वृत्तानंतर नितेश राणे यांनी आपल्याला अजित पवार काय म्हणतात, याविषयी फारशी फिकीर नसल्याचे दाखवून दिले. त्यांनी म्हटले की, अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी काही सांगितलं तर तसे वागू. जे आमची दिल्लीला तक्रार करतात त्यांनी गणेश मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीवर आक्षेप घेत त्याचा निषेध करायला हवा होता. पण तसं त्यांनी केलं नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.
आणखी वाचा