(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Praful Patel: हर्षवर्धन पाटलांची पत्राद्वारे फडणवीसांकडे तक्रार, वाद मिटवण्यासाठी अजितदादा गटाच्या हालचाली, प्रफुल्ल पटेल म्हणाले...
Maharashtra Politics: शरद पवारांची बारामती काबीज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीमधील घटकपक्षांमध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड वाद असल्याचा प्रकार समोर आला होता. हर्षवर्धन पाटील यांनी मित्रपक्षाचा पदाधिकारी मला तालुक्यात फिरु न देण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
मुंबई: भाजपचे नेते आणि राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने धमकी देण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. याविषयी हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या या पत्रामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात एकदिलाने निवडणूक लढवण्याची भाषा करणाऱ्या महायुतीच्या गोटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Camp) या वादावर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना या वादाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना पटेल यांनी म्हटले की, इंदापूरमध्ये नक्की काय झालं, हे मला माहिती नाही. पण मी एवढं नक्की सांगू शकतो की, काही ठिकाणी मतभेद किंवा गैरसमज असतील तर आम्ही सगळे एकत्र मिळून ते यशस्वीपणे सोडवू. हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांचे म्हणणे सन्मानाने ऐकून घेतले जाईल आणि ते जे काही सांगत आहेत, ते योग्यरितीने आम्ही करु, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता इंदापूरमधील या वादावर पडदा पडणार का, हे पाहावे लागेल.
हर्षवर्धन पाटलांची कन्या संतापली
हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांना पत्र पाठवून सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले. या प्रकारानंतर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, माझ्या वडिलांबाबत असं एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुकाध्य आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं. ही आपली संस्कृती नाहीय. मला त्यांना एकच सांगायचं आहे, पातळी सांभाळून बोला. आम्हीपण आमची पातळी सांभाळून बोलत आहोत, असे अंकिता पाटील यांनी संबंधितांना ठणकावून सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
हर्षवर्धन पाटील यांना अजितदादा गटाचा स्थानिक पातळीवरील पदाधिकारी धमकावत असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यांनी हर्षवर्धन पाटलांना उद्देशून म्हटले होते की, “तुझ्याजवळ काय होतं? महाले साहेब म्हणून एक होता, खरेदी-विक्री संघात अधिकारी होता. त्याच्या दाराबाहेर 2 हजारासाठी 2 तास बसावं लागत होतं, या हर्षवर्धन पाटलाला. अकलूजला मोटारसायकलवर जाण्यासाठी सावंतांकडे 3 तास दुकानात थांबायचा. आन हा काय सांगतो? मामानं असं केलं अन् तसं केलं? आरे मामा गाडीत आणि माडीतच जन्मलेला आबे. तुझ्याजवळ काय होतं तेव्हा, 1970 मध्ये मामाकडे गाडी आणि बंगला होता. तुझ्यासारखा असा भिXXXX नव्हता”, असे हनुमंत कोकाटे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला तर, मलाही ठाकरी शैलीत उत्तर देता येतं, अंकिता पाटील कडाडल्या