मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
Lok Sabha Election : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे. पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणार उतरल्या आहेत.
ABP Cvoter Opinion Poll Baramati Lok Sabha Election : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे. पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणार उतरल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad pawar, NCP)पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार (Ajit PAwar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं घेतलेल्या सर्व्हेमध्ये सध्या सुप्रिया सुळे यांचं पारडं जड दिसत आहे. सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला आहे. चौथ्यांदा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, पण यावेळी त्यांच्यापुढे सुनेत्रा पवार यांचं तगडं आव्हान असेल. पण सुरुवातीच्या कलामध्ये सुप्रिया सुळे यांचं पारडं जड दिसत आहे.
अजित पवार यांनी 40 आमदारांना हाताशी धरत शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला, त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दिलं. पण अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होत नसल्याचं ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण बारामतीमधील जनता शरद पवार यांच्या बाजूनं असल्याचं सर्व्हेच्या अंदाजातून दिसत आहे. बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांनी भावनिक साद घातल्याचाही फायदा झाल्याचं दिसत नाही.
पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे समीकरण गेली 5 दशकं राज्यात रुजले आहे. बारामतीमध्ये पवारांविरोधात आतापर्यंत कोणताही उमेदवार टिकला नव्हता. भाजपकडून अनेकदा प्रयत्न झाले, पण पवारांच्या बारामतीला धक्का लागला नव्हता. पण यावेळची निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे. शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार यांनीच शड्डू ठोकला आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. बारामतीमध्ये कोण जिंकणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेय. पण एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळत असल्याचं दिसत आहे. पण अंतिम निकाल हा 4 जून रोजी येणार आहे.
एबीपी- सी वोटर सर्व्हेचा महाराष्ट्रातील अंदाज काय?
महायुती = 30
महाविकास आघाडी = 18
-----------
एकूण = 48
कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप = 21/22
शिवसेना (एकनाथ शिंदे) = 9/10
राष्ट्रवादी (अजित पवार ) = 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) = 9
राष्ट्रवादी (शरद पवार) = 5
काँग्रेस = 3
-----------
एकूण = 48
(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)