मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
लोढा फाउंडेशनच्या वतीने मंगल प्रभात लोढा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूने आज भेटीगाठी घेणार असल्याचं निमंत्रण समोरं आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात उद्या 20 मे रोजी मतदान होत असून मुंबईसह परिसरातील एकूण 13 मतदारसंघात निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. या टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय नेतेमंडळीही कामाला लागली आहे. मुंबईतील (Mumbai) 6 जागांवर महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार फाईट आहे. त्यामुळे, प्रत्येक हालचालीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची नजर आहे. त्यातच, मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी ऐन मतदानाच्या आदल्यादिवशी स्नेहभेट मेळाव्याचं आयोजन केल्यामुळे शिवसेनेच्या आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) संताप व्यक्त केला आहे. तसेच, हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नाही का, असा सवालही त्यांनी केलाय.
लोढा फाउंडेशनकडून आज रात्री मंगल प्रभात लोढा यांच्या पेडर रोड येथे होत असलेल्या भेटीगाठीच्या कार्यक्रमावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाला आचारसंहिता असताना अशाप्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन मंत्र्यांकडूनच केले जात असेल तर यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? असा सवाल आदित्य यांनी ट्विट करून निवडणूक आयोगाला विचारला आहे.
लोढा फाउंडेशनच्या वतीने मंगल प्रभात लोढा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूने आज भेटीगाठी घेणार असल्याचं निमंत्रण समोरं आलं आहे. त्या निमंत्रण पत्रिकेनुसार, आज रात्री नऊच्या सुमारास धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, प्रेमकोर्ट, माहेश्वरी निकेतन, आनंद दर्शन या ठिकाणी मंगल प्रभात लोढा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटीगाठी घेणार आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी या निमंत्रण पत्रिका व कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत आचारसंहितेचा भंग मंत्री महोदयच करत नाहीत का? असा सवालही निवडणूक आयोगाला विचारला आहे. अर्थात निवडणूक आयोग काही कारवाई करेल, अशी अपेक्षा आम्हाला नाही. मात्र, ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम आम्ही करत असल्याचा टोलाही आदित्य यांनी आयोगाला लगावला आहे. हे मतदान आचार संहितेचे उघड उघड उल्लंघन आहे, जर हे थांबवले नाही तर आम्ही देखील त्याच ठिकाणी भेट देऊ आणि स्थानिक समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू,असा इशारा सुद्धा ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, या गुन्ह्यासाठी भवन अध्यक्ष/सचिवांवर गुन्हा का दाखल करू नये? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
For the past 30 years, I have consistently engaged with people while serving actively in public life.
— Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) (@MPLodha) May 19, 2024
Today, I have not violated model code of conduct, and I will continue to uphold them.
The code of conduct doesn't imply staying home or avoiding public interactions. Meeting… https://t.co/gMVCY73TbZ
निवडणूक आयोगाकडे तक्रार
आम्हाला व्हाट्सएपवर निमंत्रण मिळालं म्हणून आम्ही याठिकाणी आलो. जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली असं सांगण्यात आलं होतं. मंत्री असून देखील आचार संहितेचा भंग करत आहेत. लोढा यांना जेवण देण्याची हौस आहे. पण, निवडणूक खिलाडीवृत्तीने खेळा. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे,असे ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
लोढांचे प्रत्युत्तर
आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन व ट्विटवरुन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. नागरी समस्या ऐकणे म्हणजे गुन्हा नाही, गेल्या 30 वर्षांपासून मी लोकांच्या गाठीभेटी घेत असल्याचे उत्तर लोढा यांनी दिले आहे.