पत्रीपुलाचे काम 3 वर्षानंतर प्रगतीपथावर, काम पाहण्यास आदित्य ठाकरेंची उपस्थित
पत्री पूल हा येत्या महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ओळखून या कामाची पाहणी करायला स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यांच्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
कल्याण : कल्याण पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पत्री पुलाचा 76.67 लांबीचा गर्डर बसवण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून या पुलाच्या प्रतीक्षेत कल्याण आणि डोंबिवली कर आहेत. आज 30 मीटर लांबीचा गर्डर पुश थ्रू पद्धतीने सरकवण्यात आला तर उर्वरित 47 मीटर लांबीचा गर्डर उद्या रविवारी बसवला जाणार आहे. या कामासाठी आज प्रमाणेच उद्या देखील मध्य रेल्वेवर चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पत्री पूल बनवणे वाटते तितके सोप्पे काम नव्हते. असंख्य अडचणी त्यात होत्या. त्यासाठी राईट्स, एमएसआरडीसी, मध्य रेल्वे अशा अनेक संस्थांनी एकत्रित काम केले. मुख्यतः आजचे काम हे राईट्स या रेल्वेच्या विभागाने केले. आज एकूण 30 मीटर पुढे हा गर्डर सरकवला गेला तर अजून 47 मीटर पुढे तो उद्या सरकवला जाईल. त्यानंतर पुढील कामे सुरू होतील. मात्र हैदराबाद इथून आणलेला हा गर्डर जोडून तो व्यवस्थित त्याच जागी उभारणे हे मोठे जिकरीचे आणि अवघड काम होते, असे गोपाळ लंके यांनी सांगितले. ती सध्या राईट्स या कंपनी सल्लागार म्हणून काम करत आहेत. आजचे काम त्यांच्या नेतृत्वात पार पडले.
दुसरीकडे पत्री पूल हा येत्या महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ओळखून या कामाची पाहणी करायला स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यांच्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. हे सर्व त्या ठिकाणी आल्याने या पत्री पुलाचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर "आम्ही निवडणुकीपुरते राजकारण करत नाही तसेच विकासकामात राजकारण आणत नाही", असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना दिले. "जे आरोप करत आहेत त्या विरोधकांनी कधीतरी या ठिकाणी येऊन भेट द्यावी", असा खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला. पत्री पूल पूर्ण बांधून येत्या डिसेंबरपर्यंत वाहतुकीस खुला केला जाईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कल्याणचा ब्रिटिश कालीन पत्रिपुल 102 वर्षे जुना झाल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर 18 नोव्हेंबर 2018 रोजी या पुलावर हातोडा मारण्यात आला. त्यानंतर या पूलाच्या पुनर्निर्माणा चे काम एक-दीड वर्ष रखडले. पुननिर्माण सुरू झाल्यानंतर मार्च ते जून 2020 मध्ये कोरोना काळात पूर्ण काम बंद ठेवावे लागले होते. अखेर आज पुलाच्या घरचे काम सुरू करण्यात आल्याने गेले अनेक वर्ष वाहतूक कोंडीत आपला वेळ आणि कष्ट वाया घालवणाऱ्या कल्याणकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.