अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
Court Notice to Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्रीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Kangana Ranaut News : भाजप खासदार अभिनेत्री कंगना रणौत नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते, आता ती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर काही आरोप केले होते. यानंतर तिच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आता तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने तीन नोटिसा बजावल्यानंतरही कंगनाने उत्तर दिलेलं नाही, यामुळे आता तिच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कंगना रणौतने 26 ऑगस्ट 2024 रोजी आरोप केले होते. यानंतर आग्रा येथील वकील रमाशंकर शर्मा यांनी एमपी-एमएलए कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने 17 सप्टेंबर, 30 ऑक्टबर आणि 13 डिसेंबर 2024 रोजी नोटीस बजावत कंगनाला आपली बाजू मांडण्यास सांगितली होती. मात्र, कोर्टाच्या तीन नोटिसा मिळाल्यानंतरही कंगनाने कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
9 जानेवारी 2025 रोजी, या खटल्याची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने न्यू आग्रा पोलिस स्टेशनला साक्षीदारांचे जबाब नोंदवून 20 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 29 जानेवारी रोजी पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. जर या कालावधीत कंगना रणौतने उत्तर न्यायालयात दाखल केले नाही तर, न्यायालय 8 फेब्रुवारी रोजी निर्णय देईल. कंगनाने उत्तर न दाखल केल्यास तिच्याविरुद्ध जामीनपात्र आणि अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले जाऊ शकतात.
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
वकील रमाशंकर शर्मा यांनी म्हटलं की, "एका शेतकऱ्याचा पुत्र असल्याने कंगनाचं वक्तव्य अत्यंत अपमानजनक होतं. कंगनाने शेतकरी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि याप्रकरणात तिला न्यायालयामार्फत शिक्षा करून देईन". दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि हा एक गंभीर मुद्दा असल्याचं म्हटलं. आता सर्वांच्या नजरा न्यायालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. कंगना न्यायालयाच्या नोटिसीला उत्तर देणार का हेही पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :