Sharad Pawar: सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची शरद पवारांकडे आर्त हाक; भेटीनंतर म्हणाले, 'मुलगा जाणे हे दुःख कमी नाही....'
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबाची आज भेट घेतली. यावेळी, आरोपींवर योग्य ती करावाई केली जाईल, अशी ग्वाही शरद पवार यांनी सुर्यवंशी कुटुंबाला दिली आहे.
परभणी: परभणीत घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. अशातच या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाला. त्याच्या या मृत्यूनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूसंदर्भात अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबाची आज भेट घेतली. यावेळी, आरोपींवर योग्य ती करावाई केली जाईल, अशी ग्वाही शरद पवार यांनी सुर्यवंशी कुटुंबाला दिली आहे.
मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत दाखल झाले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासोबत शरद पवारांनी संवाद सांधला, त्यांचं सात्वंन केलं. घडलेल्या प्रकरणाविषयी सर्व माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं मुलाला अटक केल्याची माहिती नव्हती, तो त्या आंदोलनामध्ये नव्हता, चार दिवस तो कोठडीत होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला. माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत असा आरोप सोमनाथ यांच्या आईनं केले आहेत. या आरोपानंतर शरद पवार यांनी बोलताना, आरोपीवर योग्य ती करावाई केली जाईल, असं म्हटलं आहे. तसेच संविधान विटंबनानंतर परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
सोमनाथ जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता. तेव्हा पोलिसांनी त्याला जी वागणूक दिली. त्यामुळेच तो जग सोडून निघून गेला. त्याच्या अंगवार जे व्रण होते, ते तुम्हाला बघता आले. तुम्ही प्रत्यक्षात हे पाहिलं का असा सवाल पवार यांनी सुर्यवंशी कुटुंबाला केला. तेव्हा पवारांनी केलेल्या प्रश्नावर हो त्याच्या अंगावर मारल्याचे व्रण होते असं कुटुंबियांनी सांगितले. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जे काही घडलं ते धक्कादायक आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये अनेकांनी हा प्रश्न मांडला आहे. कुटुंबाची भूमिका काय हे जाणून घेतल्यानंतर सरकारशी मला बोलता येईल. त्यासाठीत मी आलो आहे. घडलेली घटना गंभीर आहे. राज्य सरकारपर्यंत तुमच्या भावाना मांडू. दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबाची मागणी मी सरकारकडे करेन, असे शरद पवार यांनी म्हटले. पोलिस अत्याचारमध्ये मुलगा जाणे हे दुःख कमी नाही, असंही शरद पवारांनी पुढे म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
परभणीमध्ये मंगळवारी 10 डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.
अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात असून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.