Parbhani : ओजस्वीला भरभरुन शुभेच्छा; पंतप्रधान मोदींनी दिल्या परभणीतील एका वर्षाच्या चिमुकलीला पत्ररुपी शुभेच्छा
Narendra Modi : परभणीच्या ओजस्वीचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. त्या दिवशी या मुलीच्या पालकांना पंतप्रधानांना भेटणे शक्य झालं नव्हतं.
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान मुलांवरील प्रेम सातत्यानं समोर येत आहे. मग ते 'मन की बात'मधून त्यांच्याशी संवाद साधने असो की पत्ररूपाने पाठवलेल्या शुभेच्छा असो. याची पुन्हा एकदा प्रचिती परभणीतील एक वर्षाच्या चिमुकलीला आली आहे. पंतप्रधान मोदींनी या वर्षभराच्या चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छाचे पत्र पाठवून तिचा वाढदिवस खास केला आहे.
परभणीच्या गंगाखेडमधील ओजस्वी गोपाळ मंत्री या चिमुकलीचा पहिला वाढदिवस 17 सप्टेंबरला होता. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस याच दिवशी असतो. या निमित्ताने गोपाळ मंत्री यांनी त्यांच्या मुलीला, ओजस्वीला पंतप्रधानांचे आशीर्वाद मिळावे यासाठी त्यांना भेटण्याची वेळ मागितली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे मंत्री कुटुंब हिरमुसून गेले होते.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उत्साह वाढवला तो चिमुकल्या ओजस्वीला शुभेच्छा पत्र पाठवून. जेव्हा हे पत्र पोस्टाने मंत्री कुटुंबाला मिळाले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावला नाही. कारण थेट पंतप्रधान मोदींनी आपल्या जेमतेम एक वर्षाच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या याचे कौतुक या कुटुंबाला होतं. या पत्राची चर्चा सर्वत्र झाली आणि मग काय ओजस्वीवर कुटुंब, नातेवाईक, गंगाखेडकर अशा सर्वानीच शुभेच्छांचा वर्षाव केला. या घटनेमुळे ही चिमुकली ओजस्वी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.