Parbhani : चालत्या बसची चाक निखळली, सुदैवाने अनर्थ टळला; परभणीतील वसमत रस्त्यावर घडला गंभीर प्रकार
Parbhani News : औरंगाबाद येथून नांदेडला जाणारी बस आज परभणी बस स्थानकावरून निघाली. ही बस परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील दत्त धाम परिसरात गेल्यानंतर बसची मागची एका बाजुची दोन्ही चाक एका पाठोपाठ एक निखळली.
परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था अत्यंत खराब झाल्याच्या वारंवार समोर येत आहे. परभणीत 40 प्रवासी घेऊन चाललेल्या बसची एका बाजूची दोन चाक निखळल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. निखळलेली ही दोन्ही चाकं तिथेच अडकून राहिली आणि चालकाने तात्काळ बस थांबवल्याने कुणालाही इजा झाली नाही. महत्वाचे म्हणजे मागच्या 15 दिवसात परभणी जिल्ह्यात अशा प्रकारे चाक निखळल्याची दुसरी घटना आहे.
औरंगाबाद येथून नांदेडला जाणारी बस आज परभणी बस स्थानकावरून निघाली. ही बस परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील दत्त धाम परिसरात गेल्यानंतर बसची मागची एका बाजुची दोन्ही चाक एका पाठोपाठ एक निखळली. यावेळी बस जास्त वेगात नसल्याने ही चाक तिथेच अडकली. चालक जी बी पडघन यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बाजूला थांबवली. ज्यामुळे बसमध्ये प्रवास करत असलेल्या 40 प्रवाशांचा जीव वाचला. मागच्या आठवड्यात असाच प्रकार अहमदपूरहून गंगाखेडकडे येणाऱ्या बसबरोबर देखील हा प्रकार घडला होता. बस राणीसावरगाव जवळ आली असता तिचेही मागचे दोन्ही चाक अशाच पद्धतीने निखळले होते. त्याहीवेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला होता आजही असाच प्रकार झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावर खराब झाली असताना या बसेसच्या दुरुस्तीची काम केली जात नाहीयेत का? शिवाय या बसेसकडे कनिष्ठ अधिकारी असो कि वरिष्ठ अधिकारी किंवा याचे तंत्रज्ञ लक्ष देत नाहीत का? असा प्रश्न या दोन्ही घटना घडल्याने उपस्थित होत आहे. घडलेल्या दोन्ही प्रकारांबाबत आम्ही एसटीचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. शिवाय कार्यालयातील फोन देखील कुणी उचलला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. विधीमंडळाच्या समिती कक्षात 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.