(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गावातील रोड रोमिओकडून मुलींची छेड, शिक्षकांनाही केली धक्काबुक्की, परभणीतील धक्कादायक प्रकार
Parbhani: मुलींची छेड काढणाऱ्या समज दिल्यानंतर त्या रोड रोमिओंनी थेट शाळेत घुसून धिंगाणा घातला आणि शिक्षकांना मारहाण केली.
परभणी: गावातील शाळेतून घरी जात असताना गावातील रोमिओकडून मुलींची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार परभणीतील पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे घडली. मुलींची छेड काढू नका असं समजावणाऱ्या शिक्षकांनाही थेट शाळेत धिंगाणा करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
पूर्णेच्या आहेरवाडी येथील राजश्री शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गावातील नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुली 13 जानेवारी रोजी शाळा सुटल्यावर गावाकडे जात असताना गावातील अतिष कैलास पर्वते, सचिन लिजडे, प्रशिक, सिद्धार्थ, विशाल, राजरतन यांनी दुचाकीवरून जात या मुलींची छेड काढली. तसेच यातील एका मुलीला माझे प्रपोज स्वीकार अन्यथा तुला जीवे मारतो अशी धमकी दिली असं या तक्रारीत म्हटलं आहे.
हा सर्व प्रकार या मुलींनी येऊन शाळेचे मुख्याध्यापकांना सांगितला. मुख्याध्यापकांनी तात्काळ याची दखल घेऊन मुली आणि सदर मुलांच्या पालकांना शाळेत बोलावून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. यावेळी मुलांच्या पालकांनी असा प्रकार पुन्हा होणार नाही असे आश्वासन दिले. मात्र दुसऱ्या दिवशीच, 14 जानेवारी रोजी यातील रोमिओ मुलांनी, श्रीपती राऊत, बालाजी राऊत, सुरज मानवते, आदित्य खिल्लारे, नामदेव राऊत यांनी थेट शाळेत येऊन शिक्षकांना धक्काबुक्की करत धिंगाणा घातला.
घडलेल्या या प्रकारामुळे शाळेत भीतीचे वातावरण पसरले होते. हा सर्व प्रकार घडल्यानंतर मुख्याध्यापकांनी पूर्णा पोलीस ठाण्यात अतिष कैलास पर्वते, सचिन लिजडे, प्रशिक, सिद्धार्थ, विशाल, राजरतन, श्रीपती राऊत, बालाजी राऊत, सुरज मानवते, आदित्य खिल्लारे, नामदेव राऊत या अकरा जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पूर्णा पोलीस ठाण्यात या सर्व 11 जणांवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 353,354 A,354 D,341,143,147,149 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार 11 व 12 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पूर्णा पोलीस घडलेल्या प्रकाराचा पुढील तपास करत आहेत.
ही बातमी वाचा: