Video : मराठा तरुण भडकला, थेट महादेव जानकरांना भिडला, कॅमेऱ्यासमोरच प्रश्नांची सरबत्ती!
महादेव जानकर सध्या परभणीत जोमात प्रचार करत आहेत. त्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्याशी सामना होणार आहे.
परभणी : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परभणीच्या लोकसभा मतदारसंघातही वातावरण राजकारणानं भारलेलं आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) येथून महादेव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे ते इथे जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे या मतदारसंघातून महाविकास आघाडीने संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे येथून कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा तरुणाने जानकरांवर (Mahadev Jankar) प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जानकरांनीदेखील या तरुणाला बाळा..बाळा...म्हणत शांत केलं आहे.
मराठा तरुणाने जानकरांना घेरलं
महादेव जानकर परभणी जिल्ह्यात प्रचार करत होते. यावेळी ते एबीपी माझाशी बोलत होते. मात्र जानकर मतदारसंघातील प्रश्नांविषयी बोलत असताना या मराठा तरुणाने एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत जानकरांना आडवलं. अगोदर मराठा आरक्षणाविषयी काहीतरी तोडगा काढा. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्हीच काहीतरी करू शकता. मी तुमचाच कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला परभणीतून निवडून आणतो, पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अशी विनंती या तरुणाने केली.
बाळा...बाळा..म्हणत जानकरांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
मराठा तरुणाचा हा आक्रमक पवित्रा पाहून जानकरदेखील काही काळासाठी गोंधळले. त्यांनी बाळा..बाळा..म्हणत त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी मराठा आरक्षणासाठी लढणार, असे आश्वासन जानकर यांनी त्या तरुणाला दिले. जानकर बोलत असताना समोरचा मराठा तरुण मध्ये-मध्ये बोलत होता. त्याला समजावण्याचा जानकर प्रयत्न करत होते. जानकरांनी या तरुणाला समजावून सांगताना सरकारने मराठा समाजासाठी आतापर्यंत काय-काय केलं, हे सांगितले. पण मराठा तरुण राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण आम्हाला नको आहे. आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करत होता. त्यानंतर जानकर यांनीदेखील मराठा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
जानकर मराठा समाजाच्या रोषाला कसे तोंड देणार?
माध्यमांशी बोलत असताना मराठा तरुण आक्रमकपणे बोलल्यामुळे जानकरांची यावेळी काहीशी अडचण झाली. शेवटी मराठा तरुण एक मराठा-लाख मराठा अशा घोषणा देत तेथून निघून गेला. परभणी जिल्ह्यात मराठा तरुण आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जानकर तरुणांच्या या रोषाला कसे तोंड देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :
खासदार जाधव संपत्तीतही बॉस; सव्वासहा कोटीचे मालक, परभणीत जानकरांविरुद्ध लढत