Parbhani : रडणाऱ्या बाळाला घेण्यावरून वाद झाला अन् पतीने पत्नीचा गळा आवळून जीव घेतला
Parbhani Crime News: पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर पतीने आपल्याच पत्नीची हत्या (Murder) केली आहे.
Parbhani Crime News: परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) जिंतूरमधील रमाई नगरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर पतीने पत्नीची हत्या (Murder) केली आहे. लहान बाळ रडत असल्याने पत्नीने पतीला घेण्यासाठी सांगितले. मात्र नवऱ्याने नकार दिल्यामुळे दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. दरम्यान याचवेळी रागाच्या भरात पतीने कमरेच्या बेल्टने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिता राजू अवचार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, राजू अवचार असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
सुनिता आणि राजू पती-पत्नी असून ते शहरातील रमाई नगरात राहतात. दरम्यान दोघांमध्ये 13 मार्च रोजी रात्री वाद झाला होता. सुनिताने रडणाऱ्या बाळाला घ्या असे राजूला सांगितले. पण राजूने बाळाला घेतले नसल्याने, त्यांच्यात वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, राजूने कमरेला लावलेला बेल्ट काढून सुनिताचा गळा आवळला. त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत पडून होती. दरम्यान सकाळी हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुनीताला नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
राजू हा मनोरुग्ण होता...
दरम्यान आरोपी राजू हा मनोरुग्ण असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालयात काही दिवस उपचार करण्यात आले होते. या काळात मात्र नवरा- बायको विभक्त राहत होते. मात्र घरी नातेवाईकाचे लग्न असल्याचे कारण सांगून राजू आवचार याने काही दिवसापूर्वीच पत्नी सुनीताला जिंतूर येथे आणले होते. याच काळात त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून राजूने तिचा जीव घेतला. तर या प्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा
दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, उपनिरीक्षक साहेबराव चौरे, कॉ. लीला जोगदड, बाळकृष्ण कांबळे, उमेश चव्हाण, गजानन बंदुके आदींच्या पथकाने धाव घेतली होती. तसेच तत्काळ बेशुद्ध सुनितीला रुग्णालयात दाखल केले. पण तिचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Parbhani Child Marriage : परभणीत बालविवाहाचे सत्र सुरूच, आज पुन्हा एकाच दिवशी चार बालविवाह रोखले