Parbhani News : नगर विकास विभागाकडून आयुक्त बदलीचा खेळ, रात्रीतून डॉ.लहानेंची बदली रद्द, तृप्ती सांडभोर परभणी मनपाच्या नव्या आयुक्त
Parbhani News : राज्याच्या नगर विकास विभागाने केलेल्या आयुक्त बदलीचा खेळाची सध्या परभणीत जोरदार चर्चा आहे. परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ सुनील लहाने यांची बदली रात्रीतून रद्द करण्यात आली. त्यांच्या जागी तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती झाली आहे.
Parbhani News : परभणी महानगरपालिकेच्या (Parbhani Municipal Corporation) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या नांदेडचे मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने (Dr.Sunil Lahane) यांची बदली रात्रीतून रद्द करण्यात आली. आता त्यांच्या जागी तृप्ती सांडभोर (Trupti Sandbhor) यांची परभणीच्या मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तृप्ती सांडभोर या पनवेल महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होत्या.मात्र डॉ. सुनील लहाने यांची बदली का रद्द करण्यात आली याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने केलेल्या आयुक्त बदलीचा खेळाची सध्या परभणीत जोरदार चर्चा आहे.
नगर विकास विभागाकडून आयुक्त बदलीचे तीन आदेश
परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त देविदास पवार यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागी 30 ऑगस्ट रोजी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ सुनील लहाने यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने 30 ऑगस्ट रोजी नियुक्तीचे आदेश काढले होते. अवर सचिव अ. का. लक्कसे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र ती नियुक्ती औट घटकेची ठरली. एकाच रात्रीतून डॉ सुनील लहाने यांची बदली रद्द करण्यात आली आणि त्यांच्या जागी पनवेल महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली. तर परभणी महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांची अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे तीन वेगवेगळे आदेश नगर विकास विभागाने काढले आहेत.
डॉ. सुनील लहाने तूर्तास नांदेड मनपा आयुक्त पदावर कायम
खरंतर पनवेल महानगरपालिकेत कार्यरत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड वाघाळा महापालिका इथे त्याच पदावर पदस्थापना करण्यात आली होती. परंतु नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार या पदस्थापनेत अंशत: बदल करुन तृप्ती सांडभोर यांची परभणी महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे डॉ. सुनील लहाने हे नांदेड वाघाळा मनपा आयुक्त पदावर पुढील आदेशापर्यंत कार्यरत राहतील, असं आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान एका रात्रीतून असं काय घडले की नांदेडचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची परभणीत झालेली बदली अचानक रद्द करण्यात आली, असा प्रश्न परभणीकर विचारत आहेत.
नव्या मनपा आयुक्तांसमोर अनेक आव्हानं
परभणी महापालिकेच्या नव्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असून किमान नागरी सुविधा सध्या शहरात दुरापास्त आहेत. वर्षांनुवर्षे असणाऱ्या खराब रस्त्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही आव्हानं पार करुन परभणीकरांना चांगल्या नागरी सुविधा देण्याचं काम आयुक्तांना करावं लागणार आहे.