(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News : मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गावरील कामामुळे स्थानिकांच्या जीवाशी खेळ, भूसुरुंग स्फोटात उडालेल्या दगडांमुळे घरांना भेगा
मुंबई-वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती मार्गाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात सुरु आहे. या कामादरम्यान भूसुरुंग स्फोटात उडालेले भले मोठे दगड थेट येथील नागरिकांच्या घरांवर पडून घरांचं तसंच घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.
Palghar News : मुंबई-वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती मार्गाचं (Mumbai Vadodara Expressway) काम सध्या पालघर (Palghar) जिल्ह्यात सुरु आहे. या द्रूतगती मार्गाच्या उभारणीचा ठेका घेतलेल्या आरकेसी या कंपनीकडून (RKC) इथल्या स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं समोर आलं आहे. डहाणूत उत्खननासाठी भूसुरुंग स्फोट (Landmine Explosion) केले जात आहेत. या स्फोटात उडालेले भले मोठे दगड थेट येथील नागरिकांच्या घरांवर पडून घरांचं तसंच घरातील साहित्याचं मोठं नुकसान झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
दगडांमुळे स्थानिकांच्या घरांचं आणि साहित्याचं मोठं नुकसान
डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीतील नवनाथ कोहराळी पाडा येथे सध्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी डोंगर सपाटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र यासाठी भुसुरुंग स्फोटांचा वापर करण्यात येत असून स्फोटांत उडालेल्या भल्या मोठ्या दगडांमुळे येथील 20 पेक्षा अधिक घराचं आणि घरांतील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या भागातील अनेक नागरिक हे दिवसा आपल्या शेतीच्या कामानिमित्त घरांबाहेर असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु घरांमधील टीव्ही, कपाट, फॅन घरावरील पत्रे, कौलांचं मोठं नुकसान झालं आहे.
ग्रामस्थांच्या मागणीकडे ग्रामपंचायतीकडून कानाडोळा
डहाणू हा ग्रीन झोन असल्याने या तालुक्यात भूसुरुंग स्फोट करण्यास मनाई आहे. मात्र केंद्राचा प्रकल्प असल्याने या कामासाठी भूसुरुंग स्फोटांना काही नियमांच्या चौकटीत परवानगी देण्यात आली आहे. परंतु सध्या आरकेसी या कंपनीकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. भूसुरुंग स्फोट केल्यास इथल्या घरांना धोका असल्याच या आधीच येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला पत्राद्वारे कळवलं होतं. त्यामुळे या भागात भूसुरुंग स्फोटांना परवानगी देण्यात येऊ अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र ग्रामपंचायतीकडून या सगळ्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर नुकसान झालेल्या घरांची पाहणी करुन अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवल्याचं सांगत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या सगळ्यातून आपली स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
कारवाई करणार की पाठिशी घालणार?
मात्र या सगळ्यात येथील गरीब आदिवासींचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात सक्षम अधिकारी असलेल्या डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी या कंपनीवर नेमकी काय कारवाई करतात की कंपनीला पाठिशी घालतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचाPalghar : मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गासाठीच्या जमिनींबाबत फसवणूक, शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी