(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News : श्वासनलिकेत फुगा अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू , पालघरमधील धक्कादायक घटना
Palghar News : पालघरमधील एका चिमुकल्याच्या श्वासनलिकेत फुगा अडकल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पालघर : खेळताना फुगा श्वासनलिकेत अडकल्याने तीन वर्षीय चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघरमधील (Palghar) वाडा तालुक्यात समोर आली आहे . हर्ष बुधर असं या चिमुकल्याचं नाव आहे. अवघ्या तीन वर्षाचा हा चिमुकला संध्याकाळी त्याच्या मित्रासोबत खेळत होता. त्यावेळी अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याने फुगा गिळल्याने त्याची तब्यते बिघडल्याचं त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्रांनी सांगितलं. त्यानंतर काहीच वेळात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचदरम्यान या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
उपचाराअभावी या चिमुकल्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात अजून कोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.
नेमकं काय घडलं?
हर्ष हा नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांसोबत खेळायला गेला. खेळता खेळता त्याने अचानक फुगा गिळला. तो फुगा त्याच्या श्वासनलिकेत अडकला. त्यानंतर हर्षला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला त्रास होतोय हे पाहून त्याच्या काही मित्रांनी घरी कळवलं. त्यानंतर त्याने फुगा गिळला असल्याचं त्याच्या एका मित्राने सांगितलं. त्यावेळी हर्षला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु अपुऱ्या उपचारांअभावी हर्षचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या समोर येतेय.