Palghar: पालघरमधील मासेमारी संकटात, अनेक बोटी किनाऱ्यावरच उभ्या, माशांच्या किमतीतही 30 टक्क्यांची वाढ
तीन ते चार दिवस समुद्रात प्रवास करूनही मासे मिळत नसल्याने मासेमारीसाठी गेलेल्या खलाशांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ येऊ लागली आहे.
पालघर: समुद्रातील माशांची आवक घटल्याने पालघरमधील मासेमारी व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. तीन ते चार दिवसांचा समुद्रात प्रवास करूनही जाळ्यात मासे लागत नसल्याने जिल्ह्यातील अनेक बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या असल्याचं चित्र आहे. यामुळे माशांच्या भावात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांसह मच्छीप्रेमींनाही मासे खाणं सध्या परवडत नाही.
पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय. जिल्ह्यात जवळपास दोन हजार मासेमारी बोटी आहेत. याच मासेमारीवर येथील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सध्या समुद्रात टाकलेल्या जाळ्यांमध्ये मासेच येत नसल्याने येथील मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. तीन ते चार दिवस समुद्रात प्रवास करूनही मासे मिळत नसल्याने मासेमारीसाठी गेलेल्या खलाशांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ येऊ लागली आहे. त्यामुळे अनेक बोटी या सध्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून येतात. समुद्रातून माशांची आवक घटल्याने सहाजिकच माशांचे भावही कडाडले आहेत. त्यामुळे मच्छीमारांसह मच्छी खवय्यांच्या खिशालाही सध्या कात्री लागलेली पाहायला मिळते.
पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत मिळणारे घोळ, पापलेट, दाढा हे मोठे मासे मिळण्याचं प्रमाण सध्या कमालीची घटलं आहे. तर हलवा हा मासा सध्या या भागातून नाहीसा झाला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना जाळ्यात लागेल ती लहान मच्छी घेऊन माघारी परतावं लागतंय. समुद्रातील माशांची आवक घटल्याने याचा परिणाम मच्छी विक्रेत्यांवरही झाला आहे.
एक नंबरच्या मोठ्या मच्छीच्या भावात जवळपास 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मच्छीच्या दरवाढीमुळे ग्राहक नाराज होत असले तरी स्वस्त देण्यास आम्हाला परवडत नसल्याच सांगत जिल्ह्यातील मच्छीमार सध्या आपली हतबलता स्पष्ट करत आहेत. पर्ससीन नेटमधून केली जाणारी मासेमारी, मासेमारीवर बंदी असलेला कमी केलेला कालावधी तसंच समुद्रात वाढलेले प्रदूषण यामुळे मासेमारीत घट झाली आहे.
कोकणात मासे हे प्रमुख खाद्य. मात्र सुरू असलेला विकास, त्यामुळे वाढलेले प्रदूषण आणि नवनव्या तंत्रज्ञानामुळे होणारी लहान माशांची कत्तल यावर सरकारने वेळीच निर्बंध लादले नाही तर ज्याप्रमाणे पालघरमधील हलवा मासा नाहीसा झाला तशीच येथील मच्छीमारीही संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही.