Palghar Accident : कुटुंबातील पाच जणांचा दुचाकीवरील प्रवास ठरला जीवघेणा, अपघातात मायलेकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
Palghar Accident : एकाच कुटुंबातील पाच जणांनी दुचाकीवरुन एकत्र प्रवास करणे त्यांच्या अक्षरश: जीवावर बेतले आहे.
Palghar Accident : एकाच कुटुंबातील पाच जणांनी दुचाकीवरुन एकत्र प्रवास करणे त्यांच्या अक्षरश: जीवावर बेतले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad Highway) विवळवेढे उड्डाणपुलावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना पालघरमधील (Palghar) कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मायलेकाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
पालघर तालुक्यातील सातिवली येथील एकाच कुटुंबातील पाच जण एकाच दुचाकीवरुन डहाणूतील धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते. संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात वाहिनीवर विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील उड्डाणपुलावर बारकू डवला यांच्या दुचाकीला एका अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक देऊन फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेल्या केरु बारकू डवला (वय 40 वर्षे) आणि जैविक बारकू डवला (वय 3 वर्षे) या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालवणारे वडील बारकू डवला (वय 45 वर्षे) आणि त्यांच्या दोन लहान मुली सुवर्णा डवला (वय 13 वर्षे) आणि प्राची डवला (वय 10 वर्षे) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरु
अपघाती घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस आणि महामार्ग वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमींना कासा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. तसेच अपघात करुन पळ काढणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरु केला आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय श्रीकांत शिंदे या अपघाताचा तपास करत आहेत.
पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद हायवेवर अपघातात तीन जण मृत्यूमुखी
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी इभाडपाडा इथे 25 मे रोजी दुचाकी आणि आर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला होता. महामार्ग क्रॉसिंग करुन गुजरातच्या दिशेने जात असताना भरधाव आर्टिगा कारने दुचाकीस्वारांना धडक दिली. या भीषण अपघात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यू झालेले तिघेही नाशिक जिल्ह्यातील हरसूल बारिमाळ इथले रहिवासी असल्याची माहिती आहे. छत्री बनवणाऱ्या संजान कंपनीमध्ये कामासाठी जात असताना हा अपघात घडला. सुनील वाडकर, किशोर कामडी, विक्रम कामडी अशी मृतांची नावं आहेत.
हेही वाचा