(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News : दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार; सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस
Palghar Dapchari Dairy Project : पालघर मधील दापचरी येथील दुग्ध प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपले घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आली आहे.
दापचरी, पालघर : राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील विविध भागातून आलेल्या दुग्ध प्रकल्पातील (Dapchari Dairy Project) 150 हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सरकारच्या एका नोटीशीमुळे या कुटुंबीयांना दापचरी दुग्ध प्रकल्पातील घर आणि युनिट खाली करावे लागणार आहे.
मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांना मुबलक दुग्ध पुरवठा व्हावा म्हणून तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी या भागातील जवळपास सहा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आलाी. या ठिकाणी दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प सुस्थितीत चालावा म्हणून त्यावेळेस जाहिरात काढून राज्यातील शेतकऱ्यांना येथे येऊन दुग्ध व्यवसाय करण्याचा आवाहन करण्यात आलं. मात्र कालांतराने हा उभा राहिलेला प्रकल्प प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डबघाईला गेला आणि तेव्हापासून येथे आलेले शेतकरी अडचणीत सापडले.
पालघर मधील दापचरी येथील दुग्ध प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपले घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आली आहे. मागील 50 वर्षांपासून हे कुटुंब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन या ठिकाणी वास्तव्यास आहेत. अचानक हे घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटीस आल्याने आता पुढच आयुष्य जगायचं कुठे असा प्रश्न येथील कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
1970 च्या दशकात पालघरच्या डहाणूतील दापचरी येथे हजारो हेक्टर जमीन राज्याच्या दुग्धविकास प्रकल्पाने ताब्यात घेतली. ज्या जमिनीवर दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला, त्या ठिकाणी मुंबई, ठाणे या महानगरांसह महाराष्ट्रात येथील दूध नेण्यासाठी या ठिकाणी 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हेक्टर जमीन देण्यात आली. यात काही संकरीत गायी ही देण्यात आल्या. मात्र, पुढे हाच प्रकल्प डबघाईला गेला असून सध्या येथील 160 पेक्षा अधिक कुटुंबांवर घर आणि युनिट सोडण्याची टांगती तलवार आहे.
1973-74 साली सरकारने वृत्तपत्रात जाहिरात काढत महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना या दुग्ध प्रकल्पात जमीन घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्याच्या कानाकोपऱ्यातून 200 पेक्षा अधिक कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. काही कुटुंबांनी आपले वडिलोपार्जित जमीन घर विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या दुग्ध प्रकल्पात स्थलांतरित झाले. मात्र, आता अचानक अवघ्या पंधरा दिवसात या कुटुंबांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यात. आता प्रकल्पातील कुटुंबांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आमच्या तीन पिढ्या दुग्ध प्रकल्पात गेल्या असून येथील ओसाड जमिनीला आम्ही नंदनवन केलं आहे. मात्र आता अचानक घर खाली करण्यास सांगितल्याने घर खाली करण्याऐवजी आमच्यावर जेसीबी फिरवावा अशी संतप्तजनक प्रतिक्रिया येथील महिलांकडून देण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे या महानगरांमधील दूध प्रश्न सुटावा तसेच अनेक बेरोजगार कुटुंबांना रोजगार मिळावा म्हणून या दुग्ध प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या हा प्रकल्प डबघाईला आला असून या प्रकल्पाकडे सरकार आणि या प्रकल्पाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर असलेली जमीन कोणाचे उपयोगात येणार आहे हे त्या काळातच स्पष्ट होणार आहे.