Ram Navami 2023 : पालघरमधील सातपाटी येथील राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा, मच्छीमारांनी केली होती मंदिराची स्थापना
Ram Navami 2023 : पालघर (Palghar) जिल्ह्यातील सातपाटी (Satpati) इथे एक प्राचीन राम मंदिर आहे. या राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा आहे.
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह साजरा केला जात आहे. यानिमित्त अयोध्येत आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. देशातील अनेक गावांना प्राचीन राम मंदिरांचा वारसा लाभला आहे. या मंदिरांवर देखील दृष्टीक्षेप टाकणं महत्वाचे आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील सातपाटी (Satpati) इथेही असेच एक प्राचीन राम मंदिर आहे. या राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे सर्वात मोठं जवळपास 28 हजार लोकवस्तीचं समुद्र काठावर वसलेलं निसर्गरम्य गाव आहे. या गावात मोठ्या प्रमाणात मच्छीमार लोकवस्ती आहे. या गावाची शोभा म्हणजे गावातील रामाचे भव्य मंदिर. या गावात प्रवेश करतानाच मंदिराचे दर्शन होते. मच्छीमार समाजानं भक्तीप्रेमाने भारावून वैशाख शुद्ध पंचमी शके 1803 सन 1881 मध्ये या मंदिरांची स्थापना केली आहे.
सर्व समाजातील लोक एकत्र येऊन राम नवमीचा उत्सव साजरा करतात
सातपाटी गावामधे मच्छीमार समाजाबरोबरच मुस्लिम, भंडारी, माळी अशी लोकवस्ती असून सर्व गाव गुण्यागोविंदाने दरवर्षी राम नवमी उत्सव या मंदिरात साजरा करतात. या मंदिराचं आणि गावकऱ्यांचं महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 1948 साली साने गुरुजींनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं दलितांना या मंदिरात प्रवेश दिला होता. याच मंदिर परिसरात संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेबरोबर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याच्या आवाहनानंतर मोठ्या संख्यनं ग्रामस्थ चले जाव चळवळीत सहभागी झाले होते. या चळवळीच्या आंदोलनामधे झालेल्या गोळीबारात सातपाटीमधील काशीनाथ भाई पागधरे यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.
राम मंदिरात प्रवेश करताच समोर राम लक्ष्मण सीता यांच्या सुबक मनाला भाऊन टाकणाऱ्या मुर्ती आहेत. तर उजाव्या बाजूस गणपती आणि डाव्या बाजूस हनुमान अशी सुबक मुर्ती आहेत. हे भव्य मंदिर म्हणजे कोळी समाजाचे आदराचे स्थान आहे. वर्षभरात इथे तीन मुख्य उत्सव पार पाडले जातात. तर ट्रस्ट मार्फत मंदिराच्या जिर्णोद्धारसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.
राम नवमी निमित्त तीन दिवस मोठी यात्रा
सातपाटी गावाचे शक्तिपीठ म्हणून राम मंदिरांची वेगळी ओळख आहे. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण गावकरी एकत्र येऊन मोठा सोहळा साजरा करतात. या निमित्तानं तीन दिवस मोठी यात्रा भरते. पालघर तालुक्यातील ही सर्वात मोठी यात्र असून, हजारो लोक या यात्रेत आपली हजेरी लावतात.
महत्त्वाच्या बातम्या: