Palghar : प्रसुती वॉर्डमध्ये स्लॅपचा भाग कोसळला आणि एकच खळबळ माजली; नुकतीच प्रसुती झालेल्या महिलांमध्ये भीती
Palghar : या घडलेल्या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
Palghar : पालघरमधील डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती वार्डमध्ये (Maternity Ward) स्लॅपचा काही भाग कोसळून थेट बेडवर पडला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नसलं तरीही येथे उपचार घेणाऱ्या प्रसूती महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घडलेल्या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
महिलांसोबत नवजात बालकांचा जीवही धोक्यात
या रुग्णालयातील प्रसुती वॉर्डची अवस्था पाहिली तर, भिंतीचे पोपडे निघालेले, छताची दुरावस्था, भिंतींचा रंग निघाल्याने छतातून दिसणारे सिमेंट हे चित्र सध्या दिसत आहे, पालघर जिल्ह्यातील डहाणू उपजिल्हा रुग्णालयाची ही अवस्था असून दररोज अनेक रुग्णांची वर्दळ या रुग्णालयात पाहायला मिळते, गुरुवारी अचानक प्रसुती विभागातील स्लॅबचा एक भाग बेडवर कोसळला आणि एकच खळबळ माजली. सुदैवाने त्या बेडवर कोणीही नसल्याने होत्याचं नव्हतं झालं नाही. मात्र घडलेल्या प्रकाराने या वॉर्डमधील महिला अत्यंत घाबरल्या आहेत. कारण या वॉर्डमध्ये नुकतीच प्रसुती झालेल्या महिला असल्याने त्यांच्यासोबत त्यांच्या नवजात बालकांचा जीवही धोक्यात आहे.
अचानक कोसळलेल्या छताच्या भागामुळे महिलांची चांगलीच घबराट
पालघरमधील डहाणूच्या रुग्णालयात गुरुवारी प्रसुती विभागात स्लॅबचा काही भाग कोसळला. यावेळी प्रसुती विभागात अनेक माता येथे बालकांसह उपचार घेत आहेत. छताचा भाग कोसळला तेथे बेड होता, मात्र या बेडवर कोणीही नसल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अचानक कोसळलेल्या छताच्या भागामुळे वॉर्डातील महिलांची मात्र चांगलीच घबराट झाली. रुग्णालयातील प्रसुती विभाग म्हटलं तर त्या ठिकाणी अधिक दक्षता, स्वच्छता असणे अपेक्षित असते. मात्र याच वॉर्डमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळळ्यानंतर धुराचे लोट उठले, इथल्या बेडवर तसेच जमिनीवर साचलेला सिमेंटचा ढीग, धुळीने माखलेली खोली अशा परिस्थितीत महिला आणि नवजात बालक भेदरलेल्या अवस्थेत दिसत होते. केवळ प्रसुती विभागातच नव्हे तर संपूर्ण रुग्णालयातील विविध ठिकाणी हेच दृश्य दिसून येते. अशी घटना पुन्हा उद्भवल्यास रुग्णांच्या जीवाला धोका असूनही त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल अद्याप रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
हेही वाचा>>>