(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar CM Speech : हा फेव्हिकॉलचा जोड, फडणवीसांसोबतची दोस्ती कधीही तुटणार नाही : एकनाथ शिंदे
Palghar CM Speech : "देवेंद्रजी यांच्या नेतृत्त्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन होता, आता पुन्हा नंबर वन झाला आहे," अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं.
Palghar CM Speech : "आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. ते पालघरमध्ये बोलत होते.
"देवेंद्रजी यांच्या नेतृत्त्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन होता, आता पुन्हा नंबर वन झाला आहे," अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र पुन्हा नंबर वन झाल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पालघरमधील भाषणात केला. तसंच पंचामृत अर्थसंकल्प म्हणत एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
पालघरमध्ये आज शासन आपल्या दारी ही योजनेचा कार्यक्रम आज पालघरमध्ये पार पडला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरच्या दिशेने रवाना झाले. जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आमचं सरकार जनतेच्या दारात पोहोचतंय. आतापर्यंत 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आमचं शासन पोहोचलं. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं, आमच्या सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सुरुवातीला आम्ही दोघेच मंत्रिमंडळात होतो. आता त्यामध्ये अनेकांचा समावेश झाला. कोणाला वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय घेतला नाही. सगळे निर्णय जनतेसाठी घेतले, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जनतेच्या चकरा कमी करणार
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, "सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ घेण्यासाठी चकरा मारायला लागू नये म्हणून सरकारने संकल्प केला. निर्णय लोकांपर्यत पोहोचवा यासाठी हा खटाटोप आहे. लाभार्थ्यांना चाव्यांचं वाटप झालं. आधुनिक शेतीसाठी, आधुनिक तंत्रज्ञानासाठी आपण काम करत आहे. मी आणि उपमुख्यमंत्री सुरुवातीच्या मंत्रिमंडळात होतो. आम्ही सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. पूर्वीची कॅबिनेट आणि आताच्या कॅबिनेटमध्ये आम्ही चांगले निर्णय घेतले आहेत. 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. हे सरकार 10 ते 11 महिन्यापासून स्थापन झाले त्याचा उद्देश एकच आहे, बदल घडवणे. आपण 300 ते 400 निर्णय घेतले. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून आपण निर्णय घेतले."
वर्सोवा-विरार प्रकल्प आणणार
उद्योगवाढीसाठी आपण अनेक निर्णय घेतले. आदिवासी व्यक्तीचे राहणीमान उंचावले पाहिजे हा उद्देश सरकारचा आहे. वर्सोवा ते विरार हा प्रकल्प आपण आणत आहोत. आदिवासी समाजाचे राहणीमान उंचावलं पाहिजे तसेच सर्वसामान्य लोकांचे जीवन उंचावले पाहिजे त्या साठी आम्ही प्रयत्न करतोय.
नागपूर मुंबई हा गेमचेंजर प्रकल्प आहे. त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्याचे भाग्य आम्हाला लाभलं. अनेक प्रकल्प आहेत. आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक स्पीड ब्रेकर लागले होते. सरकार स्थापन झाल्यावर आम्ही सर्व स्पीड ब्रेकर बंद केले.
आपल्या राज्यात देशात नंबर 1 चे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु आहेत. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 वर गेला.
पोलिसांनी घेतलेल्या जनसंवाद अंतर्गत रोजगार मेळाव्यातून 1800 तरुणांना रोजगार दिला. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाचं 1500 कोटीपर्यंत गेला.
देवेंद्र फडणवीसांचे प्रकल्प मविआने रखडवले
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरु केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. पण त्या योजना लोकहिताच्या होत्या. मात्र आता डबल इंजिन सरकार सत्तेत आहे. फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा मविआने करुन घेतला नाही. आता आम्ही बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या. राज्याला विकासाच्या वाटेवर आणलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं: एकनाथ शिंदे
माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. ये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी
शिवसेनेकडून (शिंदे गट) मंगळवारी (13 जून) महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्ले जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर आवळला होता.
वादानंतर शिवसेनेकडून दुसरी जाहिरात प्रसिद्ध
शिवसेनेच्या जाहिरातीवर मोठं वादंग उठल्यानंतर त्यातील चूक दुरुस्त करण्यात आली. काल (14 जून) पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये नव्याने जाहिरात देण्यात आली. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकला. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही देण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या साथीने विकासाचे पर्व महाराष्ट्रात आलं आहे, असं सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, परवाच्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त करण्यात आला.