Palghar Ganeshotsav : 50 वर्षांची परंपरा, एक गाव एक गणपती; पालघरमधील उर्से गावचा आदर्श गणेशोत्सव
Ganeshotsav 2023 : शहरातील मंडळांनी आदर्श घ्यावा असा सार्वजनिक गणेशोत्सव पालघरमधील उर्से गावात साजरा केला जात आहे. मागील 50 वर्षांपासून एक गाव, एक गणपती साजरा करण्यात येत आहे.
उर्से, पालघर : सर्व लोक नागरिक एकोप्याने राहावे याच उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे (Ganeshotsav) संकल्पना जनतेसमोर मांडली. मात्र यात संकल्पनेला या चढाओढ, स्पर्धेच्या युगात तिलांजली मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र, याला अपवाद ठरला आहे. पालघर जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तीरावर वसलेले जवळपास दोन ते अडीच हजार लोकवस्ती असलेलं आणि कुणबी आदिवासी समाज असलेले उर्से गाव अपवाद ठरत आहे. या गावात गेल्या 50 वर्षापासून 'एक गाव, एक गणपती, एक मूर्ती आणि एक उत्सव' अशी संकल्पना कोणताही खंड न पडता अविरतपणे सुरू आहे.
डहाणू तालुक्यातील कुणबी आणि आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य 'उर्सें' गाव ह्या गावाने "एक गाव एक उत्सवाच्या" माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा बाप्पा असतो (Ganesh Chaturthi). तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र, 'एक गाव, एक गणपती' सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. अशीच 'एक गाव, एक गणपती'ची संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या उर्से गावानं गेल्या 50 वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे. या वर्षी या उत्सवाचे 51 वे वर्ष आहे.
सगळेच सण एकत्रितपणे साजरे करण्यास प्राधान्य...
गेल्या 50 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरुष, आबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोस्तव ,सार्वजनिक गौरी उस्तव, नवरात्रौत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र येवून आनंदाने साजरे करत आहेत. दर वर्षी गणपती-गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, खेळांचे आयोजन केले जाते. ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावान जोपासला आहे.कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन सर्व उत्सव साजरे करतात. तर या ठिकाणी जी गणेश मूर्ती आणली जाते तीही ठराविक उंचीच असते जेणेकरून ती विसर्जनासाठी डोक्यावर सुद्धा नेता येईल त्याचप्रमाणे या गावातील तरुण एकत्र येत दरवर्षी जनतेला प्रेरणा देणारे वेगवेगळे देखावे आणि आरास नैसर्गिक साधनसामग्रीने बनवत असतात. तर या कार्यक्रमादरम्यान पारंपारिक वाद्यांवरचे नाच त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे पाच दिवसाच्या गणपती बरोबरच गौरी विसर्जन सुद्धा एकत्रित सूर्या नदीमध्ये केले जाते.
गावाबाहेरून कोणतीही वर्गणी नाही...
विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नाही. सर्व आर्थिक बाब ही गावकरीच गोळा करतात .या गावाने एक आपले स्वतःचे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे. गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात. तर सर्व काम ही श्रमदानातून केली जातात. ह्या गावाची परंपरा अशी कि गणपती व गौरी विसर्जना नंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. भगवंतावरील भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. ह्या मधून उरलेले पैसे गरजवंत शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जातात. पुढील वर्षी ह्याच पैशांतून हे सण साजरे करतात. दर वर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात.