Virar Railway Accident: रेल्वेच्या धडकेत कुटुंब संपलं; विरार स्टेशनवर पती-पत्नीसह तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Virar Railway Accident : विरार रेल्वे स्थानकावर भरधाव मेल एक्स्प्रेसच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
Virar Railway Accident : रेल्वे रुळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा, या सूचना मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांना नव्या नाहीत. स्टेशनवर वारंवार अशा घोषणा होत असतानाही प्रवासी याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं दिसतं. त्याचं पर्यवसान अपघातांमध्ये होतं. अशीच घटना लोकल ट्रेनच्या पश्चिम मार्गावर विरार रेल्वे स्थानकावर (Virar Railway Station) घडली. भरधाव मेल एक्स्प्रेसच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे. रेल्वे रुळ (Railway Track) ओलांडताना एक्स्प्रेसने धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात झाला.
रेल्वेच्या धडकेत कुटुंब संपलं
ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. विरार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच यांच्यामधील रुळ ओलांडताना हा अपघात झाला. मेल एक्स्प्रेसने या कुटुंबाला जोरदार धडक दिली. यामध्ये 28 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला आणि तीन महिन्यांचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरुष आणि महिला हे मूळ बिहारचे राहणारे असून ते मजुरीचं काम करतात. त्यांची ओळख अजून पटलेली नसून, विरार रेल्वे पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
आसनगाव रेल्वे स्थानकात लोकलच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
काल (23 मार्च) कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या 10:55 च्या लोकल खाली एक वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रेल्वस्थानकावर रुळ ओलांडत असताना लोकलच्या धडकेत या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सीताबाई पांढरे असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. या अपघातामुळे आसनगाववरुन सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ खोळंबली होती. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी एक अपघात झाल्याचा प्रवाशांनी आरोप केला आहे. तर आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा एन्डकडील 2018 साली तोडण्यात आलेला ओव्हर ब्रीज अद्यापही न बांधल्यामुळे अपघातांची मालिका थांबत नाही. यामुळे आतापर्यंत अनेक नाहक बळी गेले असल्याचं देखील प्रवाशांनी सांगितलं.
रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता
मुंबईतील लोकल सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या दररोज वाढत असताना लोकल फेऱ्या मात्र मर्यादित आहे. तर अनेकदा वेळ वाचवण्याच्या हट्टापायी अनेकजण रेल्वे रुळ ओलांडून जातात. कित्येकदा तंबी देऊन देखील सुधारणा होत नाही. त्यामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी पाहायला मिळाल्या आहेत. रेल्वे स्थानकात प्रवासी सर्रासपणे रेल्वे रुळ ओलांडत असूनही रेल्वे पोलीस मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत उभे असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे येथील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.दरम्यान, प्रवाशांनी लोकलने प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :