Pakistan Political Crisis: अविश्वास प्रस्ताव मंजूर, पाकिस्तानातील ‘इम्रान’ सत्तेचा अंत!
Pakistan Political Crisis : इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. तर, इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
Pakistan Political Crisis: पाकिस्तानमध्ये (Pakistan) सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमध्ये आता इम्रान खान यांचे सरकार पडले आहे. आज पाकिस्तानी संसदेत इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात त्यांच्या सरकारचा पराभव झाला. इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. तर, इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री 12 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. आता इम्रान खान यांचे सरकार पडल्यावर पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान शाहबाज शरीफ होणार आहेत. पंतप्रधानपदासाठी विरोधकांनी शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे.
पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. मात्र, अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवलेले इम्रान खान हे पहिले नेते आहेत. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री इम्रान मतदानापूर्वीच पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.
मतदानापूर्वी सभापतींनी दिला राजीनामा
इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच सभापतींनी राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी दुसरा नेता स्पीकरच्या खुर्चीवर बसला. याआधी आज, पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मतदान झाले, ज्यामध्ये इम्रान सरकारचा पराभव झाला आहे.
पाकिस्तानसाठी दुःखद दिवस : फवाद चौधरी
इम्रान खान यांच्या सरकारच्या पडझडीवर पाकिस्तानचे माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे की, आजचा दिवस पाकिस्तानसाठी दुःखाचा दिवस होता. ते म्हणाले की, लुटेरे परत आले आहेत. फवाद चौधरी म्हणाले की, अलीकडेच पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानातून निरोप देण्यात आला आहे. मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान आहे आणि त्याच्यासारखा नेता मिळाल्याचा आनंद आहे.
नवी पहाट सुरू झाली : शाहबाज शरीफ
पाकिस्तानचे पुढचे संभाव्य पंतप्रधान शाहबाज शरीफ इम्रान सरकार पडल्याबद्दल सभागृहात बोलताना म्हणाले की, पाकिस्तानमध्ये आज नवी पहाट सुरू होणार आहे. पाकिस्तानात अशा दिवसाची काही उदाहरणे सापडतात. आज पाकिस्तानी जनतेची प्रार्थना स्वीकारण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, नेत्यांना पाकिस्तानात तुरुंगात कसे पाठवले गेले, आम्हाला त्यात पडायचे नाही. आम्हाला पाकिस्तानला चांगले बनवायचे आहे. मला असे म्हणायचे आहे की, आम्हाला या देशाच्या जखमा भरायच्या आहेत. आम्ही कोणाचाही बदला घेणार नाही. आम्ही कुणालाही तुरुंगात पाठवणार नाही, पण कायदा स्वत:चा मार्ग स्वीकारेल. न्यायाचा विजय होईल. आपण मिळून हा देश चालवू आणि पाकिस्तानला कायदे आझमचा पाकिस्तान बनवू.
पंतप्रधान इम्रान खानविरोधात अविश्वास प्रस्ताव
पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 342 सदस्य आहेत, ज्यामध्ये 172 बहुमत आहे. पीटीआयच्या नेतृत्वाखालील युती 179 सदस्यांच्या पाठिंब्याने तयार झाली होती, ज्यामध्ये इम्रान खान यांच्या पीटीआयचे 155 सदस्य होते. पीटीआयने आपला प्रमुख सहयोगी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) गमावल्यानंतर आणि विरोधी पक्षाने 8 मार्च रोजी पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर इम्रान खानला मोठा धक्का बसला होता.
संबंधित बातम्या: