उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 200 कोटींची पीक विमा भरपाई, राणा जगजीत सिंह यांची माहिती
crop insurance : उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गेली दोन वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 200 कोटींची विमा भरपाई मिळणार आहे.
osmanabad Latest news update : उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गेली दोन वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 200 कोटींची विमा भरपाई मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन कायदेशीर मार्गाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता येतो हे यातून सिद्ध झाले आहे, असे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी मंगळवारी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा देण्यात आला. देशाच्या इतिहासात प्रथमच या पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली आहे असेही त्यांनी सांगितले. भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते आसिफ भामला , महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस दीपाली मोकाशी हे यावेळी उपस्थित होते.
आमदार राणा जगजीत सिंह म्हणाले की, 2020 च्या खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी आम्ही राज्य सरकारच्या पातळीवर सातत्याने प्रयत्न केले. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळावी या आमच्या मागणीवर विचार करण्यासाठी राज्य सरकारकडून एक बैठकही बोलावण्यात आली नाही. शेतकऱ्यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागितली, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाला स्थगिती मिळू नये म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी मान्य करत पीक विमा कंपनीला 200 कोटी रुपयांची रक्कम जमा करावयास लावली. उच्च न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवल्याने विमा भरपाई पोटी जमा करण्यात आलेल्या रकमेचे वितरण आजपासून शेतकऱ्यांना केले जाणार आहे, असेही आमदार राणा जगजीत सिंह यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ५३० कोटी रूपयांची पिक विमा भरपाई मिळणार आहे. प्रति हेक्टर 18 हजार रुपये एवढी भरपाई मंजूर झाली आहे. त्यातील 6 हजार 639 रु. चा पहिला हप्ता आज, एक नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. पुढील टप्प्यातील पैसे लवकर प्राप्त करून घेण्यासाठी आपला नियोजनबद्ध लढा सुरूच राहील. याच पद्धतीने अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पीक विमा भरपाई मिळवता येईल, त्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे योग्य ती माहिती देऊन मार्गदर्शन केले जाईल , असेही त्यांनी नमूद केले.