पनवेलमध्ये पं. गोविंदराव पटवर्धन यांना जन्मशताब्दी निमित्त संवादिनीद्वारे आदरांजली
Panvel News : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ही मैफल म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचा जिवंत वारसा असल्याचं मत रसिकांनी व्यक्त केलं.

नवी मुंबई : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि विशेषतः नाट्यसंगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे आणि संवादिनी या वाद्याला नवे परिमाण देणारे आचार्य पं. गोविंदराव पटवर्धन(Pandit Govindrao Patwardhan) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 25 सप्टेंबर रोजी होत आहे. यानिमित्त पनवेल कल्चरल सेंटरने रविवारी दिनांक 14 सप्टेंबर सायंकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून पटवर्धन यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमात त्यांचे शिष्य पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी संवादिनी वादन सादर केलं. त्यांच्या वादनातून गुरूंच्या शिकवणीची झलक प्रकट होत होती. रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
राग-रागिणींची रंगत
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं. कान्हेरे यांनी राग पूर्वीमधील एकतालातली बंदिश सादर करून मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राग जनसंमोहिनीतील रूपक तालातील बंदिश वाजवली. सुरेल बांधणी, तंतोतंत तालबद्धता आणि संवादिनीवर शब्दांचा भाव प्रकट करण्याची क्षमता यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.
नाट्यसंगीताचा अनोखा प्रवास
मध्यंतरानंतर कार्यक्रमाला नाट्यसंगीताची रंगत चढली.“विलोपले मधुमिलनात या..” “प्रेम सेवा शरण...”“जय गंगे भागीरथी” ही लोकप्रिय नाट्यगीते कान्हेरे यांनी संवादिनीवर सादर केली. नाट्यगीतं ऐकताना शब्दांचा भाव सूरांमधून प्रकट होणे ही संवादिनीवादकांसाठी आव्हानात्मक बाब मानली जाते. मात्र, पं. कान्हेरे यांनी आपल्या वादनातून शब्द आणि सूर यांचं सुंदर मिश्रण घडवून रसिकांना नवा अनुभव दिला.
विशेष म्हणजे “प्रेम सेवा शरण..” या गीतातील “मन तोडी रणबंध..” या ओळीतील ‘बंध’ हा शब्द संवादिनीवर वाजवून दाखवत त्यांनी गुरुंच्या शिकवणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
गुरूंच्या शिकवणीची आठवण
या वेळी रसिकांशी संवाद साधताना पं. कान्हेरे म्हणाले की, “गोविंदराव नेहमी सांगत असत की, संवादिनीची भूमिका नेहमी मुख्य गायकाला पूरक असावी. गायकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कधीही करू नये. मात्र, नाट्यगीतातील शब्दांचा अर्थ आणि उच्चार संवादिनीच्या सूरांतूनही श्रोत्यांपर्यंत पोहोचायला हवा.” ही शिकवण आजही त्यांच्या वादनातून प्रत्ययास येत असल्याचे त्यांनी सांगितले.
साथसंगत आणि आयोजन
पं. कान्हेरे यांना संवादिनीवर वरद सोहोनी आणि तबल्यावर संजय करंदीकर यांनी साथ दिली. दोघांचीही वादनशैली मैफलीला अधिक देखणी बनवत होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोखले यांनी कलाकारांचे स्वागत केले.तर मोहन हिंदुपूर यांनी कलाकारांचा परिचय करून दिला.
रसिकांचा आनंदोत्सव
कार्यक्रमाच्या अखेरीस रसिकांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात कलाकारांचा सत्कार केला. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ही मैफल म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचा जिवंत वारसा असल्याचं मत रसिकांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमातून पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या संगीतवारशाची उजळणी झाली आणि संवादिनीच्या सुरेल लयींमध्ये रसिकांनी संगीताचा अप्रतिम आनंद लुटला.

























