Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवीन पोलीस स्टेशन, 108 पदांची निर्मिती
Navi Mumbai International Airport Police Station : पनवेल शहर पोलीस ठाणे व उलवे पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Navi Mumbai International Airport) स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे आणि उलवे पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. 108 पदांची भर्ती करण्यात येणार असून साधारण 5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीमुळे पोलीस यंत्रणेवर सुरक्षेच्या दृष्टीने ताण येणार आहे. हे लक्षात घेवून सरकारने विमानतळासाठी नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे. यामुळे विमानतळावरील सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. सदर विमानतळाचे कामकाज 5 फेज मध्ये पूर्ण होणार आहे. संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये 4 प्रवासी टर्मिनल, 02 रनवे, 01 कार्गो ट्रक टर्मिनल आणि इतर महत्त्वाच्या संरक्षण व नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधीत आस्थापना कार्यान्वित होणार आहेत.
विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर 360 कोटी मेट्रिक टन प्रती वर्षी मालाची ने आण होणार आहे. प्रती वर्ष 9 कोटी प्रवाशी विमानतळाचा वापर करणार आहेत. परिणामी इतक्या मोठ्या प्रवासी व मालवाहतूकीच्या सुरक्षितेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्वतंत्र पोलीस ठाणे तात्काळ निर्माण करणे आवश्यक होते. यामुळे अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते.
या अनुषंगाने आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे व उलवे पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन, नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे निर्मिती केली आहे.
नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात विविध संवर्गातील एकूण 108 नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत. नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील.
पोलीस निरीक्षक - 02
सहायक पोलीस निरीक्षक- 03
पोलीस उप निरीक्षक - 06
सहायक पोलीस उपनिरीक्षक- 06
पोलीस हवालदार - 27
पोलीस शिपाई - 42
महिला पोलीस शिपाई - 19
चालक पोलीस शिपाई - 03
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर लवकरच या विमानतळावरून आंतरराष्टीय उड्डाणे सुरू होणार आहेत, ज्यामध्ये दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना सेवा देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:


















